नवी मुंबई महानगरपालिका महापे येथे जागतिक पर्यावरण दिन उत्साहात साजरा

0
IMG-20260606-WA0018

“एक पेड़ माँ के नाम” या संकल्पनेतुन वृक्ष लागवड

 

नवी मुंबई : जागतिक पर्यावरण दिनानिमित्त पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी “झाडे लावा, झाडे जगवा” तसेच “एक पेड़ माँ के नाम” या संकल्पनेतून नवी मुंबई महानगरपालिका शाळा क्रमांक 40 व 113, महापे येथे वृक्षारोपण कार्यक्रम उत्साहात पार पडला.

नवी मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांच्या प्रेरणेने, उपायुक्त (शिक्षण) तथा सचिव संघरत्ना खिल्लारे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि शिक्षण अधिकारी अशोक कडूस यांच्या पर्यावरण संवर्धनाच्या संदेशातून या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले.

 

 

यावेळी नवी मुंबई महानगरपालिका माध्यमिक विद्यालय क्र. 113, महापे येथील एनसीसी विद्यार्थ्यांसह शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष, सदस्य व पालकांच्या उपस्थितीत उपायुक्त तथा सचिव संघरत्ना खिल्लारे यांनी वृक्षारोपण केले.

कार्यक्रमादरम्यान शाळेचे मुख्याध्यापक दिपक बडगुजर यांनी संघरत्ना खिल्लारे यांना भारताच्या संविधानाची प्रत भेट देऊन सन्मानित केले. तसेच एनसीसी विद्यार्थ्यांनी शाल व पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सत्कार केला.

संघरत्ना खिल्लारे यांनी विद्यार्थ्यांना पर्यावरण संवर्धनाचे महत्त्व पटवून देत आपल्या जीवनात झाडांचे अनन्यसाधारण महत्त्व असल्याचे सांगितले. पर्यावरणाचे रक्षण करणे ही प्रत्येकाची सामूहिक जबाबदारी असल्याचा संदेशही त्यांनी दिला.

या कार्यक्रमास शाळा क्रमांक 40 चे मुख्याध्यापक मारुती गवळी, प्राथमिक व माध्यमिक विभागातील शिक्षकवृंद, शिक्षकेतर कर्मचारी तसेच विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!