माजी नगरसेवकाला माजी कार्यकर्त्यांचा दणका!
व्हॉट्सॲपवरील शिवीगाळ पडली महागात
पिंपळे रोडवर मध्यरात्री राजकीय राडा!
अमळनेर : ज्यांच्या विजयासाठी कार्यकर्त्यांनी उन्हातान्हात फिरून घाम गाळला, ज्यांच्यासाठी झेंडे उचलले आणि घोषणा दिल्या, त्याच माजी नगरसेवकाला अखेर त्यांच्याच माजी कार्यकर्त्यांच्या रोषाला सामोरे जावे लागल्याची घटना बुधवारी रात्री अमळनेरच्या पिंपळे रोड परिसरात घडल्याची चर्चा आहे.
प्रभाग क्रमांक ८ मधील या माजी नगरसेवकाचे काही जुने कार्यकर्ते आता विद्यमान नगरसेवकाच्या गोटात गेले आहेत. याच राजकीय बदलामुळे दोन्ही बाजूंमध्ये नाराजी निर्माण झाल्याचे सांगितले जाते.
त्यातच संबंधित माजी नगरसेवकाने दारूच्या नशेत व्हॉट्सॲप ग्रुपवर जुन्या कार्यकर्त्यांना अर्वाच्य भाषेत शिवीगाळ केल्याचा आरोप आहे. आपल्यासाठी वर्षानुवर्षे काम करणाऱ्यांनाच सोशल मीडियावर अपमानित केले जात असल्याने कार्यकर्त्यांचा संताप अनावर झाल्याची चर्चा आहे.
बुधवारी रात्री ११ ते १२ वाजेच्या दरम्यान हा वाद वाढून माजी नगरसेवकाला मारहाण झाल्याचे समजते.
विशेष म्हणजे, राजकारणात कार्यकर्ते बदलले की नेत्यांचे समीकरण बदलते; पण जुने कार्यकर्ते विसरले तर त्याची किंमत मोजावी लागू शकते, याची आठवण या घटनेने करून दिली!
व्हॉट्सॲप ग्रुपवर शिव्यांचा पाऊस पाडताना कदाचित समोरच्यांचा संयम किती आहे, याचा अंदाज आला नसावा. मात्र पिंपळे रोडवरील या प्रकाराने राजकीय वर्तुळात चर्चेला चांगलेच उधाण आले आहे.
एकेकाळचे ‘आ-बा-सा’ आणि आजचे माजी कार्यकर्ते यांच्यातील हा संघर्ष आता कोणते नवे वळण घेतो, याकडे अमळनेरकरांचे लक्ष लागले आहे.
