वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या जाचाला कंटाळून सहायक फौजदारची आत्महत्या
आठ पानी सुसाईट नोटमध्ये अधिकाऱ्यांचा उल्लेख; आत्महत्येपूर्वी व्हिडीओद्वारेही व्यथा मांडली
अमळनेर : तालुक्यातील पळासदळे येथील मूळ रहिवासी असलेले पी. एन. पाटील हे नवी मुंबई पोलीस दलात सहायक फौजदार म्हणून कार्यरत होते. मात्र, वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून होत असलेल्या कथित जाचाला कंटाळून त्यांनी आत्महत्येचे टोकाचे पाऊल उचलल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.
आत्महत्येपूर्वी पाटील यांनी आठ पानी सुसाईट नोट लिहिल्याचे समोर आले आहे. या नोटमध्ये त्यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून होत असलेल्या त्रासाचा उल्लेख केला असून, काही अधिकाऱ्यांची नावेही नमूद केल्याचे कागदावरील मजकुरावरून दिसून येते. त्यामध्ये DCP संजयकुमार पाटील, ACP गिरीश यांच्यासह नवी मुंबई पोलीस दलातील अधिकारी व विभागांबाबत उल्लेख असल्याचे दिसते.
पाटील यांनी आत्महत्येपूर्वी व्हिडीओही तयार केला असून, त्यामध्ये आपल्यावर आलेल्या परिस्थितीबाबत माहिती दिल्याचे सांगण्यात येत आहे. तसेच आपण हे टोकाचे पाऊल उचलत असल्याबद्दल त्यांनी कुटुंबीयांची माफी मागितल्याची माहिती आहे.
या घटनेमुळे पळासदळे परिसरात तसेच पाटील यांच्या कुटुंबीयांमध्ये हळहळ व्यक्त होत आहे. दरम्यान, सुसाईट नोट आणि आत्महत्येपूर्वीच्या व्हिडीओमध्ये करण्यात आलेल्या आरोपांची निष्पक्ष चौकशी होणे आवश्यक असून, पाटील यांच्यावर नेमका कोणत्या प्रकारचा दबाव होता, याचा तपास झाल्यानंतरच या प्रकरणामागील सत्य समोर येणार आहे.
सुसाईट नोटमध्ये उल्लेख केलेल्या अधिकाऱ्यांची भूमिका काय होती आणि या प्रकरणात पुढे कोणती कारवाई केली जाते, याकडे आता लक्ष लागले आहे.
