नगाव खून प्रकरणातील फरार आरोपी सांगलीतून जेरबंद; अमळनेर पोलिसांची कारवाई!

0
IMG-20261126-WA0012

मयत शरद पाटील यांच्या कुटुंबीयांच्या आंदोलनानंतर पोलिसांची मोठी हालचाल

विपुल गोसावीसह तिघांना अटक करून न्यायालयात हजर

अमळनेर : नगाव येथील शेतकरी शरद पाटील यांच्या खून प्रकरणातील फरार आरोपींना अखेर अमळनेर पोलिसांनी सांगली येथून अटक केली आहे. विपुल गोसावी याच्यासह अन्य दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून, पुढील कायदेशीर प्रक्रियेसाठी आज त्यांना न्यायालयात हजर करण्यात आले. या कारवाईमुळे अनेक दिवसांपासून न्यायाच्या प्रतीक्षेत असलेल्या शरद पाटील यांच्या कुटुंबीयांना दिलासा मिळाला आहे.

अमळनेर तालुक्यातील नांद्री गावाजवळ वाळूच्या डंपरखाली चिरडून शरद पाटील यांचा खून झाल्याची घटना घडली होती. या प्रकरणी अमळनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. मात्र, या प्रकरणातील आरोपी फरार असल्याने त्यांच्या अटकेचा प्रश्न अनेक दिवसांपासून चर्चेत होता. आरोपी मोकाट फिरत असल्याचा आरोप करत शरद पाटील यांच्या नातलगांनी काही दिवसांपूर्वी अमळनेर तहसील कार्यालयात आंदोलन केले होते. यावेळी त्यांनी पोलिसांच्या कार्यपद्धतीबाबत तीव्र नाराजी व्यक्त करत आरोपींना तातडीने अटक करण्याची मागणी केली होती.

या आंदोलनानंतर आणि प्रकरणाबाबत सातत्याने उपस्थित होत असलेल्या प्रश्नांच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवत सांगली येथे कारवाई केली. विपुल गोसावी व अन्य दोघांना अटक करून न्यायालयात हजर करण्यात आल्याने या प्रकरणाला आता महत्त्वाचे वळण मिळाले आहे.

 

‘दिव्य लोकतंत्र’च्या बातम्यांचा इम्पॅक्ट!

 

शरद पाटील खून प्रकरणातील आरोपींच्या अटकेचा मुद्दा ‘दिव्य लोकतंत्र’ने सातत्याने मांडला. आरोपींच्या अटकेबाबत उपस्थित केलेले प्रश्न, कुटुंबीयांची न्यायासाठीची धडपड आणि पोलिसांच्या भूमिकेबाबत व्यक्त झालेली नाराजी यामुळे या प्रकरणाकडे पुन्हा एकदा प्रशासनाचे लक्ष वेधले गेले. त्यानंतर झालेल्या पोलिसांच्या कारवाईमुळे ‘दिव्य लोकतंत्र’च्या बातम्यांचा इम्पॅक्ट दिसून येत असल्याची चर्चा नागरिकांमध्ये होत आहे.

दरम्यान, फरार आरोपींना अटक करून कारवाई केल्याबद्दल अमळनेर पोलिसांचे अभिनंदन होत आहे. मात्र, या खून प्रकरणातील संपूर्ण सत्य समोर यावे, तपास निष्पक्षपणे पूर्ण व्हावा आणि दोषींना कायद्यानुसार कठोर शिक्षा मिळावी, अशी अपेक्षा शरद पाटील यांच्या कुटुंबीयांसह नागरिकांकडून व्यक्त होत आहे.

आरोपींच्या अटकेनंतर आता तपासात आणखी कोणते धागेदोरे समोर येतात आणि न्यायालयीन प्रक्रियेत पुढे काय घडते, याकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे.

दरम्यान पोलिसांनी तिघांना न्यायालयात हजर केले असता त्यांना पाच दिवसांची पोलीस कोठडी मिळाली आहे. 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!