दोन हजार दिल्याचा माज; म्हणून CHO ला कामावर जायची वाटते लाज?
डॉ. गोसावी साहेब, दोन हजार रुपयांना प्राधान्य देण्यापेक्षा रुग्णसेवेला प्राधान्य द्या!
एकही डॉक्टर पूर्णवेळ कर्तव्यावर नसल्याच्या तक्रारी; जबाबदार कोण?

अमळनेर : तालुक्यातील आरोग्य सेवेचा विषय पुन्हा एकदा ऐरणीवर आला असून, याकडे आरोग्य प्रशासन दुर्लक्ष का करीत आहे, असा गंभीर प्रश्न नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे. तालुक्यातील विविध आरोग्य उपकेंद्रे तसेच अमळनेर शहरातील आरोग्यवर्धिनी केंद्रांमध्ये डॉक्टर पूर्णवेळ उपलब्ध नसल्याच्या तक्रारी समोर येत आहेत. एकीकडे शासन सर्वसामान्य नागरिकांना त्यांच्या जवळच्या आरोग्य केंद्रात उपचार मिळावेत यासाठी विविध योजना राबवत आहे, तर दुसरीकडे प्रत्यक्षात डॉक्टरच वेळेवर उपलब्ध नसतील, तर या योजनांचा उपयोग काय, असा सवाल उपस्थित होत आहे. रुग्णसेवा ही आरोग्य विभागाची प्राथमिक जबाबदारी असताना तिला दुय्यम स्थान दिले जात असल्याची भावना नागरिकांमध्ये निर्माण झाली आहे.
समुदाय आरोग्य अधिकारी (CHO) यांच्याकडून दर महिन्याला प्रत्येकी दोन हजार रुपये घेतले जात असल्याची चर्चा यापूर्वीपासून सुरू होती. मात्र या कथित आर्थिक व्यवहारासंदर्भात अमळनेर येथील एका वरिष्ठ आरोग्य अधिकाऱ्याशी पत्रकार डॉ. समाधान एकनाथ मैराळे यांनी थेट संवाद साधला असून, त्या संभाषणाचे रेकॉर्डिंग स्वतः केले आहे. हे रेकॉर्डिंग दिव्य लोकतंत्र न्यूजच्या हाती आले आहे. त्यामुळे दोन हजार रुपयांच्या कथित व्यवहाराचा विषय पुन्हा चर्चेत आला असून, या प्रकरणामागील नेमके सत्य काय, याची उच्चस्तरीय चौकशी होण्याची गरज निर्माण झाली आहे. दर महिन्याला पैसे दिले जात असल्याची चर्चा असेल, तर हे पैसे कोणाच्या सांगण्यावरून जमा केले जातात, त्यामागील कारण काय आणि या कथित व्यवहारांचा लाभ नेमका कोणाला होतो, असे अनेक प्रश्न अनुत्तरित आहेत.
काही समुदाय आरोग्य अधिकाऱ्यांमध्ये पैसे दिल्यानंतर आपल्यावर कोणीही कारवाई करू शकत नाही, अशी भावना निर्माण झाली आहे का, असा सवालही नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे. मात्र दोन हजार रुपयांच्या कथित व्यवहारांची चर्चा एका बाजूला आणि दुसऱ्या बाजूला आरोग्य केंद्रांवरील डॉक्टरांच्या अनुपस्थितीच्या तक्रारी, ही परिस्थिती अत्यंत गंभीर आहे. शासनाकडून वेतन आणि सुविधा मिळत असताना संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांनी प्रामाणिकपणे कर्तव्य बजावणे अपेक्षित आहे. नागरिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी जातात, तेव्हा त्यांना डॉक्टर उपलब्ध होणे ही मूलभूत अपेक्षा आहे. डॉक्टर वेळेवर उपलब्ध नसतील, तर रुग्णांना खासगी दवाखान्यांकडे धाव घ्यावी लागते आणि आर्थिक भुर्दंड सहन करावा लागतो.
तालुका आरोग्य अधिकारी डॉ. गिरीश गोसावी यांनी या परिस्थितीकडे गांभीर्याने लक्ष देण्याची आवश्यकता आहे. डॉ. गोसावी साहेब, दोन हजार रुपयांच्या कथित व्यवहारांच्या चर्चेपेक्षा रुग्णसेवेला प्राधान्य देणे अधिक महत्त्वाचे नाही का? तालुक्यातील आरोग्य उपकेंद्रे आणि अमळनेर शहरातील आरोग्यवर्धिनी केंद्रांमध्ये डॉक्टर पूर्णवेळ उपलब्ध नसल्याच्या तक्रारी येत असताना त्यावर नियंत्रण कोण ठेवणार? संबंधित डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीची जबाबदारी कोणाची? रुग्णांना वेळेवर उपचार मिळत नसतील, तर त्याला जबाबदार कोण, याचे उत्तर आरोग्य प्रशासनाने देणे गरजेचे आहे. केवळ कागदोपत्री कामकाज पूर्ण करून आरोग्य सेवा सुरळीत असल्याचे दाखविण्यापेक्षा प्रत्यक्षात रुग्णांना सेवा मिळते की नाही, याला अधिक महत्त्व दिले पाहिजे.
या संपूर्ण प्रकरणाची जिल्हा परिषद प्रशासनाने उच्चस्तरीय आणि निष्पक्ष चौकशी करावी, अशी मागणी होत आहे. CHO यांच्याकडून दर महिन्याला प्रत्येकी दोन हजार रुपये घेतल्याच्या कथित आरोपांमागील सत्य जनतेसमोर आणावे. प्रकरणात लाच मागणी किंवा आर्थिक गैरव्यवहार झाल्याचे निष्पन्न झाल्यास लाचलुचपत प्रतिबंधक विभाग तसेच आवश्यकतेनुसार आर्थिक गुन्हे शाखेमार्फत पुढील कारवाई करावी. त्याचबरोबर अमळनेर तालुक्यातील सर्व आरोग्य उपकेंद्रे आणि आरोग्यवर्धिनी केंद्रांच्या कामकाजाचा आढावा घेऊन डॉक्टरांची उपस्थिती, कर्तव्यावरील वेळ आणि प्रत्यक्ष रुग्णसेवेची स्थिती याबाबत जबाबदारी निश्चित करावी.
अखेर सर्वसामान्य नागरिकांनी आरोग्य केंद्रात उपचारासाठी जायचे तरी कोणाकडे? डॉक्टर पूर्णवेळ उपलब्ध नसतील आणि कथित आर्थिक व्यवहारांच्या चर्चा सुरू असतील, तर या संपूर्ण परिस्थितीला जबाबदार कोण? डॉ. गिरीश गोसावी आणि जिल्हा आरोग्य प्रशासन या प्रश्नांची उत्तरे देणार का? अमळनेरच्या जनतेला आश्वासनांपेक्षा प्रत्यक्ष आरोग्य सेवा हवी आहे. दोन हजार रुपयांच्या कथित व्यवहारांच्या चर्चेला पूर्णविराम देऊन रुग्णसेवेला सर्वोच्च प्राधान्य देण्याची वेळ आता आली आहे.
