आगामी सण-उत्सवांच्या पार्श्वभूमीवर पोलिसांचा शहरभर रूट मार्च
अवैध दारूविक्री व दारूभट्ट्यांवर कारवाईचे आदेश
रात्री १० वाजेपर्यंत दुकाने बंद ठेवण्याचे निर्देश
अमळनेर : आगामी सण-उत्सव शांततेत आणि कायदा-सुव्यवस्था अबाधित राखत पार पडावेत, यासाठी अमळनेर शहरात पोलिसांच्या वतीने भव्य रूट मार्च काढण्यात आला. शेकडो पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या सहभागामुळे या रूट मार्चने शहरवासीयांचे लक्ष वेधून घेतले.

जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत ढीवरे, अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते, उपविभागीय पोलीस अधिकारी विनायक कोते, पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम यांच्यासह वरिष्ठ पोलीस अधिकारी व कर्मचारी रूट मार्चमध्ये सहभागी झाले होते. शहरातील प्रमुख मार्गांवरून पोलिसांनी संचलन करत नागरिकांमध्ये सुरक्षिततेचा आणि कायदा-सुव्यवस्थेचा विश्वास निर्माण केला.
आगामी सण-उत्सवांच्या पार्श्वभूमीवर शहरात कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी पोलिस प्रशासनाने विशेष खबरदारी घेतली आहे. अवैध दारू निर्मिती व विक्रीला आळा घालण्यासाठी शहर व परिसरातील दारूभट्ट्या उद्ध्वस्त करून अवैध दारूचा व्यवसाय बंद करण्याचे निर्देश जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत ढीवरे यांनी दिले आहेत.
तसेच शहरातील दुकाने रात्री १० वाजेपर्यंत बंद करण्याचे आदेशही देण्यात आले आहेत. कायदा-सुव्यवस्था बिघडविणाऱ्या किंवा नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांविरोधात कठोर कारवाई केली जाईल, असा इशाराही पोलिस प्रशासनाकडून देण्यात आला आहे.
सण-उत्सव शांततेत पार पाडण्यासाठी नागरिकांनी पोलिस प्रशासनाला सहकार्य करावे, अफवांवर विश्वास ठेवू नये आणि कायदा-सुव्यवस्था राखण्यासाठी जबाबदारीने वागावे, असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे.
