पैलाड जलकुंभ परिसरातील नागरिकांची पाणीटंचाईबाबत नगरपरिषदेकडे तक्रार

0
IMG-20260606-WA0008

तातडीने उपाययोजनांची मागणी

 

अमळनेर : शहरातील पैलाड जलकुंभ परिसरातील नागरिकांनी वारंवार होणाऱ्या पाणीपुरवठ्याच्या समस्येबाबत अमळनेर नगरपरिषदेच्या लोकनियुक्त नगराध्यक्ष डॉ. परिक्षित बाविस्कर व मुख्याधिकारी गणेश शिंदे यांच्याकडे लेखी निवेदन सादर करून तातडीने उपाययोजना करण्याची मागणी केली आहे.

नागरिकांनी दिलेल्या निवेदनानुसार, पैलाड जलकुंभासमोर राहणाऱ्या रहिवाशांना गेल्या अनेक वर्षांपासून पिण्याच्या पाण्यासाठी मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. परिसरातील जुन्या पाईपलाईनमधून पाणीपुरवठा होत असल्याने अनेकदा पुरेसा दाब मिळत नाही. परिणामी जलकुंभातून वितरित होणारे पाणी संपूर्ण भागात पोहोचत नसल्याची तक्रार करण्यात आली आहे.

निवेदनात म्हटले आहे की, दरवेळी 10 ते 12 घरांना पाणीटंचाईचा सामना करावा लागतो. याबाबत अनेकदा पाणीपुरवठा विभागाच्या कर्मचाऱ्यांना तोंडी व लेखी स्वरूपात कळविण्यात आले असूनही समस्येचे कायमस्वरूपी निराकरण झालेले नाही. जुन्या व जीर्ण झालेल्या लाईनची तपासणी करून आवश्यक त्या ठिकाणी नवीन पाईपलाईन टाकण्यात यावी, तसेच नागरिकांना नियमित व पुरेशा दाबाने पाणीपुरवठा व्हावा, अशी मागणी करण्यात आली आहे.
उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर पाणीटंचाई अधिक तीव्र होत असल्याने नागरिकांमध्ये नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे. नगरपरिषदेच्या प्रशासनाने या प्रश्नाकडे गांभीर्याने लक्ष देऊन त्वरित कार्यवाही करावी, अन्यथा नागरिकांना तीव्र आंदोलनाचा मार्ग स्वीकारावा लागू शकतो, अशी भावना काही रहिवाशांनी व्यक्त केली.

या निवेदनावर परिसरातील अनेक नागरिकांच्या स्वाक्षऱ्या असून संबंधित प्रकरणाची प्रत जिल्हाधिकारी, जळगाव यांनाही माहितीस्तव पाठविण्यात आली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!