अमळनेर तालुक्यात चोरट्यांचा हैदोस ;|पोलीस निरीक्षक निकम कायदा कायदासूव्यवस्था राखण्यात नाकाम ठरताय का?
पातोंडा, मठगव्हाणमध्ये एकाच रात्री दुकानफोडीच्या घटना ; शेतशिवारात केबल चोरीचे सत्र सुरूच!
पोलिसांच्या कार्यक्षमतेवर शेतकऱ्यांसह सर्वसामान्य नागरिकांचीही नाराजी!

अमळनेर : तालुक्यात चोरट्यांनी अक्षरशः धुमाकूळ घातला असून, आता चोरट्यांच्या निशाण्यावर थेट दुकाने आणि व्यापारी आले आहेत. पातोंडा आणि मठगव्हाण येथे रात्रीच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी अनेक दुकाने फोडल्याची घटना समोर आली आहे. पातोंडा येथे श्री मेडिकल, ज्वेलर्सचे दुकान आणि कृषी केंद्राला चोरट्यांनी लक्ष्य केले, तर मठगव्हाण येथे हॉटेल आणि कृषी केंद्र फोडण्यात आले. एकाच रात्री दोन गावांमध्ये घडलेल्या या घटनांमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली असून व्यापारी आणि ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
या चोरीच्या घटनांमध्ये मोटारसायकलवरून आलेले तीन अज्ञात चोर सीसीटीव्ही फुटेजमध्ये कैद झाले आहेत. मात्र, फुटेजमध्ये त्यांचे चेहरे स्पष्ट दिसत नसल्याने त्यांची ओळख पटविण्याचे पोलिसांसमोर आव्हान आहे. तीन जणांची टोळी मोटारसायकलवरून येऊन दुकानांना लक्ष्य करत असेल, तर परिसरात पोलिसांची गस्त नेमकी किती प्रभावी आहे, असा प्रश्न आता उपस्थित होत आहे. सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे या चोरट्यांचा माग काढून त्यांना तातडीने अटक करणे आवश्यक आहे.

विशेष म्हणजे, हा प्रकार केवळ दुकानफोडीपुरता मर्यादित नाही. पातोंडा, दहिवद परिसरातील शेतशिवारात गेल्या दोन महिन्यांपासून विहिरी आणि बोअरवेलच्या महागड्या केबल चोरीचे सत्र सुरू आहे. चोरटे केबल कापून नेतात आणि शेतातील ठिबक सिंचनाच्या नळ्या पेटवून त्यात केबल वितळवून तांबे काढतात. केबल चोरीबरोबरच गुरे चोरीच्या घटनाही वाढत असल्याने शेतकरी आधीच त्रस्त आहेत. सहा दिवसांत दोनदा केबल चोरीच्या घटना घडूनही चोरट्यांचा बंदोबस्त झालेला नाही. शेतकऱ्यांनी उधारीने नवीन केबल आणून टाकल्या, तरी चोरट्यांनी पुन्हा त्याच केबलवर डल्ला मारल्याने शेतकऱ्यांचे आर्थिक कंबरडे मोडले आहे.
आता त्यात दुकानफोडीच्या घटनांची भर पडली आहे. म्हणजे शेतातील केबल सुरक्षित नाहीत, गुरे सुरक्षित नाहीत आणि गावातील दुकानेही सुरक्षित नाहीत, अशी परिस्थिती निर्माण होत आहे. चोरट्यांना पोलिसांचा धाक उरला आहे की नाही, असा प्रश्न नागरिक विचारत आहेत.
याहून गंभीर बाब म्हणजे अमळनेर शहरातील अवैध धंद्यांबाबतही सातत्याने प्रश्न उपस्थित होत आहेत. सट्टा-मटका, अवैध दारू विक्रीसारखे व्यवसाय सर्रास सुरू असल्याच्या तक्रारी आहेत. दुसरीकडे विविध गंभीर गुन्ह्यांतील आरोपी अद्याप अटकेबाहेर असल्याच्या तक्रारीही समोर येत आहेत. गोहत्या प्रकरण, हत्या प्रकरण, रेशन घोटाळा आणि ॲट्रॉसिटीच्या गुन्ह्यांतील आरोपींच्या अटकेबाबत प्रश्न उपस्थित होत असताना आता तालुक्यात चोऱ्यांचे सत्रही थांबण्याचे नाव घेत नाही. त्यामुळे अवैध धंदे सर्रास, चोर मोकाट, गंभीर गुन्ह्यांतील आरोपी मोकाट; मग पोलीस नेमके करतात काय? हा प्रश्न केवळ शेतकऱ्यांचाच नसून सर्वसामान्य नागरिकांचाही झाला आहे.
पातोंडा आणि दहिवद परिसरातील चोरीच्या घटनांनंतर संतप्त शेतकऱ्यांनी रास्ता रोको आंदोलनाचा इशारा दिला होता. त्यानंतर पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम आणि उपविभागीय पोलीस अधिकारी विनायक कोते यांनी घटनास्थळी भेट देऊन शेतकऱ्यांना रात्रीची गस्त वाढविण्याचे आणि चोरट्यांचा बंदोबस्त करण्याचे आश्वासन दिले होते. मात्र, आता पातोंडा आणि मठगव्हाण येथील दुकानफोडीच्या घटनांमुळे या आश्वासनांनंतरही चोरट्यांचे धाडस कमी झालेले नसल्याचे चित्र दिसत आहे.
पोलीस प्रशासनाने आता केवळ पंचनामे आणि आश्वासने देण्यापलीकडे जाऊन प्रत्यक्ष कारवाई करण्याची गरज आहे. पातोंडा व मठगव्हाण येथील दुकानफोडीच्या घटनांचा एकत्रित तपास करावा, सीसीटीव्ही फुटेजची तांत्रिक तपासणी करावी, मोटारसायकलवरून फिरणाऱ्या तीन संशयितांची ओळख पटवावी आणि चोरीचा मुद्देमाल हस्तगत करून आरोपींना अटक करावी. तसेच शेतशिवारात नियमित रात्रीची गस्त सुरू करून केबल व गुरे चोरणाऱ्या टोळ्यांचाही बंदोबस्त करावा.
व्यापाऱ्यांनी दुकानात माल ठेवायचा की रात्रभर दुकानाच्या सुरक्षेची चिंता करायची? शेतकऱ्यांनी पिकांना पाणी द्यायचे की शेतातील केबल आणि मोटारींची राखण करायची? सर्वसामान्य नागरिकांनी सुरक्षिततेची अपेक्षा कोणाकडून करायची? असे प्रश्न आता उपस्थित होत आहेत.
अमळनेर तालुक्यात कायद्याचा धाक गुन्हेगारांना आहे की फक्त सर्वसामान्य नागरिकांनाच कायद्याचे पालन करण्याची जबाबदारी आहे? अवैध धंदे रोखणे, चोरट्यांना पकडणे आणि गंभीर गुन्ह्यांतील आरोपींना अटक करणे ही पोलिसांची मूलभूत जबाबदारी नाही काय? पोलीस निरीक्षक निकम कायदा सुव्यवस्था राखण्यात नाकाम ठरले का? जिल्हा पोलीस अधीक्षकांनी या संपूर्ण परिस्थितीची गंभीर दखल घेऊन अमळनेर पोलीस यंत्रणेच्या कामकाजाचा आढावा घ्यावा. अन्यथा चोरट्यांचे धाडस वाढतच राहणार आणि सामान्य नागरिकांच्या मनातील पोलिसांविषयीचा विश्वास कमी होत जाणार!
