आंदोलन की पक्षांतर्गत दुटप्पी भूमिका?

0
IMG-20260715-WA0029

स्वतःच्या पक्षाच्या आंदोलनावर मौन, नगराध्यक्षांच्या बाजूने नगरसेवक; कार्यकर्त्यांबाबतच मिरच्या का झोंबल्या?

 

 

अमळनेर : नगराध्यक्षांच्या कार्यालयात झालेल्या आंदोलनानंतर शहरातील राजकीय वातावरण अधिक तापले असून, या प्रकरणात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष या विरोधी गटातील एका नगरसेवकाने नगराध्यक्षांची उघडपणे बाजू घेतल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.

विशेष म्हणजे आंदोलन करणारे कार्यकर्ते हे त्याच पक्षाशी संबंधित होते, संबंधित नगरसेवकांनी आंदोलनावर टीका करत नगराध्यक्षांचे समर्थन केल्यामुळे पक्षांतर्गत मतभेद उघड झाल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.

स्थानिक नागरिकांमध्ये असा सवाल उपस्थित होत आहे की, जर आंदोलन चुकीचे होते, तर त्याच पक्षाच्या कार्यकर्त्यांना आधी समज का दिली गेली नाही? आंदोलन करणाऱ्यांवर कारवाईची मागणी न करता नगराध्यक्षांची बाजू घेण्यामागे नेमका उद्देश काय, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

राजकीय जाणकारांच्या मते, लोकप्रतिनिधीने नागरिकांच्या प्रश्नांवर भूमिका घेणे अपेक्षित असते. मात्र स्वतःच्या पक्षातील कार्यकर्त्यांनी आंदोलन केल्यानंतर त्यांच्यावरच अप्रत्यक्ष टीका करणे आणि विरोधक नगराध्यक्षांच्या समर्थनार्थ भूमिका मांडणे हे पक्षनिष्ठेपेक्षा वैयक्तिक राजकारणाचे लक्षण असल्याची चर्चा रंगू लागली आहे.

“कार्यकर्त्यांच्याच मिरच्या का झोंबल्या?”

शहरात अशीही चर्चा आहे की, आंदोलन जर केवळ प्रसिद्धीसाठी किंवा राजकीय स्टंटबाजीसाठी होते, तर त्याचा खुलासा पक्षानेच करायला हवा होता. उलट आंदोलनाचे समर्थन न करता नगराध्यक्षांची बाजू घेणाऱ्या नगरसेवकांमुळे स्वतःच्या पक्षातील कार्यकर्त्यांमध्ये नाराजी वाढल्याचे बोलले जात आहे. याच कार्यकर्त्यांच्या जीवावर निवडून आलेले नगरसेवक जर त्याच कार्यकर्त्यांच्या विरोधात बोलत असतील व त्यांच्याच बाबतीत मिरच्या झोंबत असतील तर याला काय म्हणावे?

राजकीय विश्लेषकांच्या मते, या संपूर्ण प्रकरणामुळे विरोधकांपेक्षा पक्षांतर्गत विसंवादच अधिक स्पष्ट झाला असून, आगामी स्थानिक राजकारणात याचे पडसाद उमटण्याची शक्यता नाकारता येत नाही.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!