शेतातील मक्याच्या भुंक्यांना आग
ठिबक सिंचनाचेही मोठे नुकसान

अमळनेर : तालुक्यातील एकतास येथील शेतकरी सतिलाल अंकुश पाटील यांच्या शेतातील मक्याच्या भुंक्यांना अज्ञात व्यक्तीकडून आग लावण्यात आल्याची घटना घडली. ही घटना रात्री १ ते २ वाजेच्या सुमारास घडल्याने परिसरात खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, शेतात साठवून ठेवलेल्या मक्याच्या भुंक्यांना अचानक आग लागली. आग वेगाने पसरल्याने शेतातील ठिबक सिंचनाच्या साहित्याचेही मोठे नुकसान झाले. आग लागल्यानंतर संबंधित अज्ञात व्यक्ती घटनास्थळावरून पसार झाल्याचे सांगितले जात आहे.
घटनेची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेत आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला. मात्र, तोपर्यंत मक्याचे भुंके आणि ठिबक सिंचन साहित्य जळून खाक झाले होते. या घटनेमुळे शेतकरी सतिलाल पाटील यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले असून परिसरातील शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
या प्रकरणी संबंधित व्यक्तीचा शोध घेऊन कठोर कारवाई करावी, अशी मागणी ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे. घटनेचा पुढील तपास सुरू आहे.
