अमळनेर शेतकी संघ निवडणुकीत तिरंगी लढत; महायुतीतील खासदार-आमदार आमनेसामने !
तर शिवसेना शिंदे गट अलिप्त ?

अमळनेर : अमळनेर तालुका शेतकरी सहकारी संघाच्या पंचवार्षिक निवडणुकीत यंदा तिरंगी लढत रंगण्याची चिन्हे स्पष्ट झाली आहेत. महायुतीतील राजकीय संघर्ष समोर येत असून खासदार स्मिता वाघ व आमदार अनिल पाटील यांचे स्वतंत्र पॅनल रिंगणात उतरल्याने राजकीय वातावरण तापले आहे. त्याचबरोबर महाविकास आघाडीनेही स्वतंत्र पॅनल जाहीर केल्याने निवडणूक अधिक रंगतदार होणार आहे.
राजकीय वर्तुळात भाजपमधील अंतर्गत गटबाजीमुळेच भाजपने स्वतंत्र पॅनल उभे केल्याच्या चर्चा सुरू आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसकडून आमदार अनिल पाटील यांच्या नेतृत्वाखाली “राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सहकार पॅनल” मैदानात उतरले असून भाजपकडून खासदार स्मिता वाघ यांच्या नेतृत्वाखाली “किसान विकास पॅनल” जाहीर करण्यात आले आहे.
विशेष म्हणजे महायुतीतील घटक पक्ष असलेल्या शिवसेना शिंदे गटाने या निवडणुकीत तुलनेने अलिप्त भूमिका घेतल्याचे दिसून येत आहे. शिंदे गटाकडून स्वतंत्र ताकद दिसून न आल्याने स्थानिक राजकीय वर्तुळात विविध चर्चांना उधाण आले आहे. त्यामुळे ही लढत प्रामुख्याने भाजप विरुद्ध राष्ट्रवादी अशीच रंगत असल्याचे चित्र आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सहकार पॅनलकडून व्यक्तीशः मतदार संघातून शिसोदे अनिल शिवदास (डांगरी), पाटील संजय पुंजाजी (पिंपळे), बागुल दीपक जगतराव (मंगरूळ), पाटील चंद्रकांत वसंत (पिंगळवाडे) व पाटील संभाजी लोटन (लोणपिरसिम) यांना उमेदवारी देण्यात आली आहे. सोसायटी मतदार संघातून पाटील सचिन बाळू (अंतुर्ली), भामरे गणेश धर्मराज (ब्राह्मणे), पाटील नितीन बापूराव (गडखांब), पाटील संजय त्र्यंबक (चौबारी) व पाटील पंकज शांताराम (निमझरी) रिंगणात आहेत. महिला राखीव मतदार संघातून पाटील मालुबाई बापूराव (झाडी) व देसले सुभमा वासुदेव (दहीवद) यांना संधी देण्यात आली आहे.
तर किसान विकास पॅनलकडून सोसायटी मतदार संघातून प्रफुल्ल हिरालाल पवार (मालपूर), जितेंद्र दिनकर पाटील (फाफोरे), सौ. सुदर्शना राजमल पाटील (रामेश्वर), महेंद्र सुदाम महाजन (अमळनेर) व महेश प्रभाकर देशमुख (गांधली) यांची उमेदवारी जाहीर झाली आहे. व्यक्तीशः मतदार संघातून बंडू लक्ष्मण पाटील (सोनखेडी), भिका पिरण पाटील (निसर्डी), संजय माधवराव पाटील (भरवस), चंद्रकांत श्रीराम पाटील (गलवाडे) व गिरीश सोनजी पाटील (अमळगाव) हे निवडणूक रिंगणात उतरले आहेत. महिला राखीव मतदार संघातून कल्याणी दिनेश साळुंखे (मारवड) यांना उमेदवारी देण्यात आली आहे.
याशिवाय महाविकास आघाडीनेही स्वतंत्र पॅनल उभे केल्याने निवडणुकीत चुरस वाढली आहे. ग्रामीण भागातील सहकार क्षेत्रावर वर्चस्व मिळवण्यासाठी सर्वच पक्षांनी ताकद लावली असून आगामी काळात प्रचाराची रणधुमाळी आणखी वाढण्याची शक्यता व्यक्त होत आहे.
शेतकरी संघ निवडणुकीत महायुतीतील दोन मोठे नेते आमनेसामने आल्याने या निवडणुकीकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे.
