वामन नगरच्या महिलांचा नगरपालिकेवर मोर्चा; पाणीप्रश्नी संताप व्यक्त
दिव्य लोकतंत्रचे बातमी प्रसिद्ध केल्यानंतर पालिकेवर जनतेचा संताप
येत्या काही दिवसात विरोधकांचाही मोर्चा असल्याची माहिती
अमळनेर : शहरातील पिंपळे रोड परिसरातील वामन नगर भागात गेल्या चार ते पाच महिन्यांपासून अपुऱ्या पाणीपुरवठ्यामुळे नागरिक त्रस्त झाले असून अखेर महिलांनी सोमवारी (दि. १५) नगरपालिकेवर मोर्चा काढत प्रशासनाच्या विरोधात संताप व्यक्त केला. विशेष म्हणजे दोन दिवसांपूर्वी दिव्य लोकतंत्रने अमळनेर शहरातील पाणीटंचाई व इतर समस्यांचा प्रश्न ऐरणीवर आणणारे वृत्त प्रकाशित केले होते. त्यानंतरही समस्या कायम राहिल्याने महिलांनी थेट नगरपालिकेचे दरवाजे ठोठावले. तर येत्या काही दिवसात विरोधकांचाही पालिकेवर पाणीप्रश्नी मोर्चा होणार असल्याची माहिती आहे.
वामन नगर परिसरात नियमित आणि पुरेशा प्रमाणात पाणी मिळत नसल्याने नागरिकांचे दैनंदिन जीवन विस्कळीत झाले आहे. दि. १२ रोजी करण्यात आलेल्या पाणीपुरवठ्यावेळी केवळ अर्धा तासच पाणी मिळाल्याचा आरोप नागरिकांनी केला. यापूर्वीही अशाच प्रकारे अपुरा पाणीपुरवठा होत असल्याची तक्रार नागरिकांनी वारंवार केली होती.
नागरिकांनी सांगितले की, याबाबत मार्च महिन्यातच व्हॉलमन, नगरसेवक, पाणीपुरवठा सभापती आणि मुख्याधिकारी यांना निवेदन देऊन परिस्थिती निदर्शनास आणून दिली होती. तसेच अनेक वेळा दूरध्वनीद्वारे संपर्क साधूनही कोणतीही ठोस कार्यवाही करण्यात आली नसल्याचा आरोप करण्यात आला.
दरम्यान, सोमवारी सकाळी मोठ्या संख्येने महिला नगरपालिकेत दाखल झाल्या. वामन नगरसाठी स्वतंत्र नवीन व्हॉल बसविण्यात यावा अथवा पिंपळे रोडवरील मुख्य जलवाहिनीशी जोडणी करून नियमित पाणीपुरवठा करण्यात यावा, अशी मागणी त्यांनी केली.
मात्र, महिलांना नगरपालिकेत मुख्याधिकारी, नगराध्यक्ष किंवा पाणीपुरवठा सभापती यांची भेट मिळाली नाही. त्यामुळे त्यांनी आपल्या मागण्यांचे निवेदन पाणीपुरवठा विभागाच्या कर्मचाऱ्यांकडे सुपूर्द केले. यावेळी प्रशासनाच्या उदासीन कारभाराबद्दल तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली.
महिलांनी इशारा दिला की, पुढील आठ दिवसांत सुरळीत व पुरेसा पाणीपुरवठा सुरू झाला नाही तर अधिक तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडण्यात येईल आणि त्याची सर्वस्वी जबाबदारी नगरपालिकेची राहील.
शहरात आधीच पाणीपुरवठा, स्वच्छता आणि मूलभूत सुविधांबाबत नागरिकांमध्ये नाराजी वाढत असताना वामन नगरातील महिलांच्या या मोर्चामुळे पाणीप्रश्न पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. आता प्रशासन या मागण्यांची कितपत दखल घेते, याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.
