“हवासपोटी सत्ता मिळवली, जनतेला मात्र असुविधांच्या नालीत ढकललं?”

0
IMG-20260614-WA0016

सत्ताधारी सुस्त, विरोधक मस्त; अमळनेरच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष?

 

अमळनेर : शहराच्या विकासासाठी आणि मूलभूत सुविधा सुधारण्यासाठी जनतेने मोठ्या अपेक्षेने लोकनियुक्त नगराध्यक्ष व नगरपरिषदेतील सत्ताधाऱ्यांच्या हाती सत्ता दिली. मात्र आज अमळनेर शहरातील परिस्थिती पाहता नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत असून पाणीपुरवठा, स्वच्छता आणि विकासकामांच्या प्रश्नांवर प्रशासनासह सत्ताधाऱ्यांवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.

शहरातील अनेक भागांमध्ये पूर्वी सहा दिवसांनी येणारे पाणी आता दहा-दहा दिवस उलटूनही मिळत नसल्याच्या तक्रारी नागरिकांकडून होत आहेत. वाढत्या उष्णतेच्या पार्श्वभूमीवर पिण्याच्या पाण्यासाठी नागरिकांची मोठी गैरसोय होत असून महिलांना आणि ज्येष्ठ नागरिकांना विशेष त्रास सहन करावा लागत आहे. पाणीटंचाईच्या समस्येवर ठोस उपाययोजना होत नसल्याने संताप वाढत आहे.
दुसरीकडे शहरातील अनेक भागांमध्ये स्वच्छतेचा अभाव जाणवत आहे. रस्त्यांच्या कडेला साचलेला कचरा, तुंबलेल्या गटारी आणि अनियमित साफसफाईमुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. स्वच्छतेबाबत प्रशासन आणि लोकप्रतिनिधी गंभीर नसल्याचा आरोप नागरिकांकडून केला जात आहे.

याशिवाय शहरातील विविध विकासकामे रखडल्याचे चित्र दिसत आहे. अनेक प्रलंबित कामे अद्याप पूर्ण झालेली नसून काही ठिकाणी कामांचा वेग अत्यंत संथ असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. विकासाच्या नावावर आश्वासने मिळाली, मात्र प्रत्यक्षात कामे होत नसल्याने नागरिकांमध्ये नाराजी वाढत आहे.

या पार्श्वभूमीवर विरोधी पक्षाच्या भूमिकेवरही प्रश्न उपस्थित केले जात आहेत. सत्ताधाऱ्यांवर सातत्याने टीका करणारे आणि जनतेच्या प्रश्नांवर आवाज उठविण्याचा दावा करणारे विरोधक सध्या शांत का आहेत, असा प्रश्न नागरिक विचारत आहेत. नगराध्यक्ष आणि विरोधक यांच्यात कुठली राजकीय हातमिळवणी झाली आहे का, अशी चर्चा शहरात रंगू लागली आहे.
राजकीय निरीक्षकांच्या मते, जर अशी कोणतीही हातमिळवणी नसल्यास विरोधकांनी जनतेच्या प्रश्नांवर आक्रमक भूमिका घेणे अपेक्षित आहे. पाणी, स्वच्छता आणि विकासकामांबाबत सत्ताधाऱ्यांना जाब विचारण्याची जबाबदारी विरोधकांचीही आहे. मात्र या विषयांवर त्यांची शांतता अनेक शंका निर्माण करत आहे.

दरम्यान, जनतेने दिलेल्या मतांचा सन्मान राखण्यासाठी सत्ताधारी आणि विरोधक या दोघांनीही आपली जबाबदारी पार पाडणे आवश्यक असल्याचे मत नागरिक व्यक्त करत आहेत. शहरातील मूलभूत समस्या तातडीने सोडवून नागरिकांना दिलासा देण्याची मागणी जोर धरत आहे.
“सत्ता जनतेच्या सेवेसाठी असते; जर नागरिकांना पाणी, स्वच्छता आणि विकासाच्या मूलभूत सुविधांसाठी संघर्ष करावा लागत असेल, तर जनतेच्या अपेक्षांचे काय झाले?” असा सवाल आता अमळनेरकर विचारू लागले आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!