खासदार स्मिता वाघ यांच्या गावालाच 25 वर्षांपासून टँकरचे पाणी

0
Screenshot_2026-06-16-12-10-42-123_com.google.android.googlequicksearchbox-edit

एवढे वर्ष स्मिता ताईंनी काय केले ? राष्ट्रवादी (शप)चे प्रा. अशोक पवार यांचा सवाल

 

अमळनेर  : अमळनेर तालुक्यातील डांगर उर्फ उदयनगर या गावाला गेल्या सुमारे 25 वर्षांपासून पिण्याच्या पाण्यासाठी टँकरवर अवलंबून राहावे लागत असल्याचा आरोप करत राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) चे जिल्हा उपाध्यक्ष प्रा. अशोक पवार यांनी खासदार स्मिता वाघ यांच्यावर टीका केली आहे.

प्रा. पवार यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, डांगर उर्फ उदयनगर हे विद्यमान खासदार स्मिता वाघ यांचे मूळ गाव असून, त्यांनी जिल्हा परिषद सदस्य, जिल्हा परिषद अध्यक्षा, विधान परिषद आमदार तसेच खासदार अशी विविध महत्त्वाची पदे भूषविली आहेत. याशिवाय पक्ष आणि विविध समित्यांमध्येही त्यांनी जबाबदाऱ्या सांभाळल्या आहेत. मात्र एवढा प्रदीर्घ राजकीय अनुभव आणि सत्तेतील सहभाग असूनही त्यांच्या गावाचा कायमस्वरूपी पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटलेला नाही, असे त्यांनी नमूद केले.

टँकरद्वारे पाणीपुरवठा करावा लागत असल्याने शासनावर अतिरिक्त आर्थिक भार पडत असून ग्रामस्थांनाही पुरेसे व शुद्ध पाणी मिळत नसल्याचा दावा त्यांनी केला आहे. दूषित पाण्यामुळे ग्रामस्थांच्या आरोग्यावर परिणाम होत असून उपचारासाठी आर्थिक खर्च सहन करावा लागत असल्याचेही पत्रकात म्हटले आहे.

“सत्ता नेमकी कोणासाठी वापरली जात आहे आणि जनतेचे कोणते प्रश्न सुटत आहेत?” असा प्रश्न उपस्थित करत प्रा. पवार यांनी केंद्र व राज्यात दीर्घकाळ भाजपची सत्ता असतानाही उदयनगरच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न का मार्गी लागला नाही, असा सवाल केला आहे.

दरम्यान, स्मिता वाघ यांच्याबाबत कोणताही व्यक्तिगत आकस किंवा द्वेष नसल्याचे स्पष्ट करत, ग्रामीण, गरीब, वंचित आणि शेतकरी वर्गाच्या मूलभूत प्रश्नांसाठी सत्तेचा वापर व्हावा, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!