अमळनेर ACB ट्रॅप प्रकरण : अमळनेर तहसीलदार व ACB च्या विरोधात तक्रारदाराची वरिष्ठांकडे धाव
ACB नाशिक SP यांच्यासह विविध ठिकाणी तक्रार दाखल

अमळनेर (प्रतिनिधी) : येथील लाचलुचपत प्रकरणात गंभीर आरोप करत तक्रारदाराने थेट वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे धाव घेतल्याने तालुक्यात खळबळ उडाली आहे.
तक्रारदाराने महाराष्ट्र राज्य लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, नाशिक यांना सविस्तर लेखी तक्रार सादर केली असून ACB धुळे पथक व अमळनेर तहसीलदार यांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.
तक्रारीनुसार, दि. 28 एप्रिल 2026 रोजी झालेल्या कारवाईत तहसीलदारांच्या नावाने 50 हजार रुपयांची मागणी करण्यात आली होती. यापैकी 25 हजार रुपये स्वीकारताना आरोपी रंगेहात पकडण्यात आल्याचा दावा करण्यात आला आहे. मात्र, या प्रकरणात मुख्य संबंधितांवर अपेक्षित गुन्हा दाखल न झाल्याचा आरोप तक्रारदाराने केला आहे.
तक्रारदाराने नमूद केले आहे की, भ्रष्टाचार प्रतिबंधक कायदा 1988 अंतर्गत कलम 7, 12 व 13(1)(d) लागू होण्याची शक्यता असतानाही संबंधित तहसीलदारांवर कारवाई करण्यात आलेली नाही. तसेच सर्वोच्च न्यायालयाच्या “State vs. P. Satyanarayana Murthy (2015)” या निकालानुसार ‘मागणी’ हा गुन्हा सिद्ध करण्यासाठी अत्यावश्यक घटक असताना तो मुद्दा दुर्लक्षित करण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे.
तपास प्रक्रियेत त्रुटी असल्याचेही तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. CrPC कलम 173(8) अंतर्गत पुढील तपास (Further Investigation) करण्याची मागणी करण्यात आली असून, प्रकरणातील CCTV फुटेज, कॉल डिटेल रेकॉर्ड (CDR) तसेच इतर इलेक्ट्रॉनिक पुरावे तपासात समाविष्ट करण्याची विनंती करण्यात आली आहे.
दरम्यान, या प्रकरणाची चौकशी धुळे विभागाबाहेरील स्वतंत्र ACB युनिट किंवा विशेष तपास पथक (SIT) मार्फत करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली आहे, तसेच आवश्यक असल्यास प्रकरण केंद्रीय अन्वेषण विभागाकडे (CBI) वर्ग करण्याचीही मागणी करण्यात आली आहे.
निष्पक्ष तपास न झाल्यास उच्च न्यायालयात याचिका (PIL) दाखल करण्याचा इशाराही देण्यात आला आहे. या घडामोडींमुळे प्रशासनातील पारदर्शकता व विश्वासार्हतेबाबत पुन्हा प्रश्न निर्माण झाले असून, पुढील कारवाईकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
