प्रशासनाचा ढिसाळ कारभार; पेट्रोल पंपांवर रांगाच रांगा

0

काळ्याबाजाराचा संशय तीव्र

 

 

अमळनेर : शहरासह परिसरात पेट्रोल व डिझेल टंचाईची गंभीर परिस्थिती निर्माण झाली असून नागरिकांना अक्षरशः तासन्तास रांगेत उभे राहावे लागत आहे. अनेक पेट्रोल पंपांवर वाहनांच्या लांबलचक रांगा लागलेल्या दिसत आहेत, तर काही ठिकाणी “स्टॉक संपला” असे फलक लावून पंप बंद ठेवले जात असल्याचे चित्र आहे.

दरम्यान, सर्वाधिक धक्कादायक बाब म्हणजे कॅन व प्लास्टिक बाटल्यांमध्येही पेट्रोल-डिझेलची सर्रास विक्री सुरू असल्याचे उघड होत आहे. नियमांनुसार अशा प्रकारे इंधन विक्रीवर निर्बंध असताना देखील उघडपणे हा प्रकार सुरू असल्याने प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.
नागरिकांच्या मनात आता एकच प्रश्न निर्माण झाला आहे. रोज पेट्रोल-डिझेलचा पुरवठा होत असताना हे इंधन नेमकं जातं कुठे? काही पेट्रोल पंप चालक जाणीवपूर्वक साठा लपवून ठेवत आहेत का? कृत्रिम टंचाई निर्माण करून दरवाढ किंवा काळाबाजाराचा डाव तर रचला जात नाही ना? अशा शंका व्यक्त केल्या जात आहेत.
यामुळे सामान्य नागरिकांचे हाल होत असून, वाहतूक व्यवस्था देखील विस्कळीत होत आहे. प्रशासन मात्र या गंभीर परिस्थितीकडे दुर्लक्ष करत असल्याचे चित्र दिसत आहे.

तर पेट्रोल पंपांवर तात्काळ छापे टाकून साठ्याची तपासणी करावी, कॅन व बाटल्यांमधील बेकायदेशीर विक्री त्वरित बंद करावी, इंधन पुरवठ्याची पारदर्शक माहिती जाहीर करावी, दोषी आढळणाऱ्या पंप चालकांवर कडक कारवाई करावी अशी मागणी होत आहे. 

जर वेळेत कारवाई झाली नाही, तर परिस्थिती आणखी बिघडण्याची शक्यता असून नागरिकांमध्ये तीव्र संताप पसरत आहे. प्रशासनाने तात्काळ जागे होऊन ठोस पावले उचलण्याची गरज आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!