तहसीलदारांच्या नावाने लाच मागणी खोटी असेल तर त्यांच्याकडून संबंधितांवर कायदेशीर कारवाई का नाही ?
लाच मागणीला तहसीलदारांची मुख संमती होती का ?

अमळनेर : तहसीलदारांच्या नावाने लाच मागितल्याचे प्रकरण समोर आल्यानंतर शहरात मोठी खळबळ उडाली आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने केलेल्या कारवाईत दोन खासगी व्यक्तींना अटक झाल्याची माहिती असताना, या प्रकरणातील एक महत्त्वाचा प्रश्न मात्र अद्याप अनुत्तरितच आहे.
तहसीलदारांच्या नावाचा गैरवापर होत असताना त्यांच्याकडून स्वतंत्र कायदेशीर कारवाई का करण्यात आलेली नाही?
स्थानिक नागरिकांमध्ये याबाबत तीव्र चर्चा सुरू असून, “जर तहसीलदारांचा या प्रकरणाशी काहीही संबंध नसेल, तर त्यांच्या नावाने लाच मागणाऱ्यांविरोधात त्यांनी स्वतः पुढाकार घेऊन तक्रार दाखल करणे अपेक्षित होते,” अशी भूमिका काही सामाजिक कार्यकर्ते मांडत आहेत.
या पार्श्वभूमीवर नागरिकांच्या मनात विविध प्रश्न निर्माण होत आहेत. काहींच्या मते, “कारवाई न झाल्याने संशय अधिक गडद होतो. प्रशासनाने यावर स्पष्ट भूमिका मांडणे आवश्यक आहे,” असे मत व्यक्त होत आहे. मात्र, याबाबत अधिकृतरीत्या कोणतीही स्पष्ट माहिती अद्याप तहसीलदार यांच्या कडून समोर आलेली नाही.
तज्ज्ञांच्या मते, अशा प्रकरणांमध्ये संबंधित अधिकाऱ्यांनी स्वतःहून स्पष्टीकरण देणे, तसेच आपल्या नावाचा गैरवापर करणाऱ्यांविरोधात कायदेशीर पावले उचलणे अत्यंत आवश्यक असते. त्यामुळे प्रशासनावरील विश्वास टिकवून ठेवता येतो.
दरम्यान, या संपूर्ण प्रकरणात सत्य काय आहे, याची सखोल चौकशी होणे गरजेचे असून, संबंधित अधिकाऱ्यांकडून लवकरच अधिकृत भूमिका जाहीर होण्याची अपेक्षा नागरिक व्यक्त करत आहेत.
