टक्केवारीच्या नावाखाली लाच घेणारा ग्रामसेवक जाळ्यात
अमळनेर तालुक्यातील कारवाई, आर. डी. पवार अटकेत

अमळनेर : विकास कामांच्या बिलांवर टक्केवारी मागत लाच स्वीकारणाऱ्या नगाव (ता. अमळनेर) येथील ग्रामसेवक आर. डी. पवार यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडत अटक केली आहे. या कारवाईमुळे अमळनेर तालुक्यात खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, तक्रारदाराकडून विकास कामांच्या मोबदल्यात 84 हजार रुपयांची मागणी करण्यात आली होती. चर्चेनंतर 50 हजार रुपये देण्याचे ठरले. याबाबत तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केली.
तक्रारीची शहानिशा करून पथकाने सापळा रचला. ठरल्याप्रमाणे 50 हजार रुपये स्वीकारताना ग्रामसेवक आर. डी. पवार यांना रंगेहाथ पकडण्यात आले. त्यानंतर त्यांना तात्काळ अटक करण्यात आली.
या प्रकरणी संबंधितांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे. या कारवाईमुळे अमळनेर तालुक्यातील प्रशासकीय यंत्रणेत एकच खळबळ उडाली आहे.
