अमळनेरच्या शिस्तप्रिय वारशाला तडा; महाविकास आघाडीच्या मोर्चात दालनातच शिवीगाळ!

0

खासदार असतांना अमळनेरकडे पाठ फिरवणाऱ्या उन्मेष पाटलांना अचानक अमळनेरचा पुळका कसा ?

अमळनेर : महाविकास आघाडीच्या बुधवारी अमळनेर येथे काढण्यात आलेल्या मोर्चादरम्यान प्रशासनाच्या दालनातच झालेल्या वादावादी आणि शिवीगाळीमुळे खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे या गोंधळात माजी खासदार उन्मेष पाटील यांनी थेट अधिकाऱ्यांशी अश्लाघ्य भाषेत संवाद साधल्याचा आरोप असून, विद्यमान आमदार – खासदार यांनाही शिवीगाळ केली आहे. तर काही स्थानिक पुढाऱ्यांनी देखील यास मौनसंमती दिल्याचे बोलले जात आहे.

एकीकडे अमळनेरला संत सानेगुरुजींसारख्या थोर व्यक्तींची भूमि म्हणून ओळख आहे, तर दुसरीकडे लोकप्रतिनिधींच्या अशा वर्तनामुळे शहराच्या प्रतिमेला डाग लागत असल्याची चिंता नागरिक व्यक्त करत आहेत.

लोकप्रतिनिधींनीच दाखवली असंवेदनशीलता?

माजी खासदार उन्मेष पाटील यांच्या उपस्थितीमुळे मोर्च्यात एकप्रकारचा राजकीय नूर निर्माण झाला खरा, पण जेव्हा त्यांनीच प्रशासनातील अधिकाऱ्यांशी उर्मटपणे बोलणे सुरू केले, तेव्हा सामान्य कार्यकर्ते आणि अधिकारी दोघेही संभ्रमित झाले. आश्चर्याची बाब म्हणजे खासदार असताना अमळनेरात फारसे न दिसलेले हेच माजी खासदार आज अचानक इतके सक्रिय का झाले, यावर सोशल मीडियावरून अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत.

बाहेरून नेत्या, मोर्च्याकडे पाठ फिरवलेली जनता

मोर्च्यात सहभागी झालेल्या अनेक नेत्यांचा तालुक्याबाहेरील असल्याचा आरोप देखील जनतेकडून करण्यात आला आहे. स्थानिक पातळीवर पुरेसा पाठिंबा नसल्यामुळेच ‘बाहेरून कुबड्या’ आणाव्या लागत असल्याचा आरोप विरोधक करत आहेत. विशेष म्हणजे शहरातील नागरिकांनी या मोर्च्याकडे फारसा उत्साह दाखवला नाही, ही बाब देखील महत्त्वाची ठरते.

अमळनेरचं सामाजिक भान कुठे हरवतेय?

सानेगुरुजींनी शिकवलेली शिस्त, प्रतिपंढरपूराची संतपरंपरा आणि मंगळग्रहाच्या जिद्दीची आठवण देणाऱ्या अमळनेरात जर थेट अधिकाऱ्यांच्या दालनातच शिवीगाळ होणार असेल, तर हा तालुका कोणत्या दिशेने चाललाय, असा सवाल निर्माण होतो.

लोकशाहीत आंदोलन हे हक्काचे माध्यम आहे, पण त्याची अभद्र दिशेने वाटचाल होत असेल, तर त्यावर लोकांनीच प्रश्न विचारले पाहिजेत. अमळनेरची पत सांभाळायची की राजकारणात बुडवायची, हा निर्णय आता जनतेचाच!

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!