लाखोंचा बंधारा दीड वर्षात खचला; चौकशीची मागणी तीव्र
रुबजी नगरजवळील बोरी नदीवरील बंधारा पुरात वाहून गेला; कामाच्या गुणवत्तेवर गंभीर प्रश्न

अमळनेर : शहरातील रुबजी नगरजवळील बोरी नदीवर दीड वर्षांपूर्वी बांधण्यात आलेला बंधारा नदीला आलेल्या पाण्यामुळे वाहून गेला आहे. या बंधाऱ्याचे बांधकाम माजी खासदार उन्मेष पाटील यांच्या खासदार निधीतून करण्यात आले असल्याचे समजते. पाटबंधारे विभागाच्या माध्यमातून उभारण्यात आलेल्या या बंधाऱ्याची ही अवस्था झाल्यामुळे जनतेत संतापाचे वातावरण आहे.
केवळ दीड वर्षांपूर्वी लाखो रुपयांच्या खर्चाने उभारण्यात आलेला बंधारा इतक्या कमी कालावधीतच कोसळल्याने बांधकामाची गुणवत्ता मोठ्या संशयाच्या भोवऱ्यात सापडली आहे. या बंधाऱ्याच्या निर्मितीत मोठ्या प्रमाणावर निकृष्ट दर्जाचे साहित्य वापरण्यात आल्याचा आरोप होत आहे.
सदर प्रकरणात कोणत्याही अधिकाऱ्याने किंवा ठेकेदाराने हलगर्जीपणा केला असल्यास त्याची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी जोरदार मागणी नागरिक व सामाजिक कार्यकर्त्यांकडून केली जात आहे.
दरम्यान, बंधाऱ्याच्या मदतीने सिंचनासाठी पाणी उपलब्ध होते, मात्र आता पाणी साठवणूक होऊ शकत नसल्याने शेतीच्या दृष्टीने संकट निर्माण झाले आहे.
स्थानिक प्रशासनाने तातडीने याची दखल घेऊन या ठिकाणी नव्याने आणि दर्जेदार बांधकाम करून दुरुस्ती करावी, तसेच यास जबाबदार असणाऱ्या अधिकाऱ्यांवर आणि ठेकेदारांवर कारवाई करावी, अशी मागणी जोर धरत आहे.
