वाळू माफियांनी पुन्हा काढले डोके वर…!

0

पांझरा काठ व उत्राण येथून अमळनेरात खुलेआम येतेय अवैध वाळू

जबाबदार अधिकाऱ्यांना दिवाळीची ‘मिठाई’ मिळाल्याने कारवाया थंडावल्या?

 

अमळनेर :  तालुक्यात वाळू माफियांनी पुन्हा एकदा उफाण घेतला असून, प्रशासनाच्या नजरेआड किंवा सांगड घालून खुलेआम अवैध वाळू उपसा व वाहतूक सुरू आहे. पांझरा नदीकाठावरील मांडळ गाव हे अवैध वाळू उपशाचे केंद्रबिंदू बनले असून, त्याचबरोबर एरंडोल तालुक्यातील उत्राण वाळू ठेक्यावरूनही हजारो ब्रास वाळू अमळनेरमध्ये आणली जात आहे.

अवैध वाळू उपसा वाढीवर, पण कारवाई थंड

पावसाचा जोर ओसरताच नदीपात्रातील वाळू उपसाचे प्रमाण झपाट्याने वाढले आहे. उत्राण व पांझरा काठावरून दररोज डझनावारी ट्रॅक्टर आणि डंपरच्या माध्यमातून वाळूचा उपसा होतोय. ही वाळू मुख्यतः अमळनेर शहर व तालुक्यातील बांधकामांपर्यंत पोहचवली जात आहे. विशेष बाब म्हणजे, यासाठी कोणतीही वैध परवानगी किंवा वाहतूक परवाना घेतलेला नाही.

‘दिवाळीची मिठाई’ आणि यंत्रणांचे मौन

स्थानिक नागरिक व सामाजिक कार्यकर्त्यांनी याबाबत अनेक वेळा तक्रारी केल्या असल्या, तरी प्रशासन,  महसूल विभाग मात्र गप्प. स्थानिक पातळीवर हे जोरदार चर्चेत आहे की, वाळू माफियांकडून ‘दिवाळीची मिठाई’ म्हणजेच लाचस्वरूप धनादेश किंवा रोकड काही अधिकाऱ्यांना पोहचल्याने कारवाई थंडावली आहे.

पर्यावरण आणि महसुली नुकसान

या अवैध वाळू उपशामुळे नदीपात्राचे स्वरूप बदलत आहे, भूगर्भातील पाणी पातळीवर परिणाम होत आहे आणि प्राकृतिक जैवविविधतेचा मोठा ऱ्हास होत आहे. याचबरोबर शासनाचा दररोज लाखो रुपयांचा महसूल बुडत आहे.
अवैध वाळू वाहतुकीवर रोख न लावल्यास, हे अमळनेर तालुक्यातील कायदा-सुव्यवस्थेवरही गंभीर प्रश्न निर्माण करू शकते.

नवीन जिल्हाधिकाऱ्यांकडून अपेक्षा

जिल्ह्यात नुकतेच श्री. घुगे यांनी जिल्हाधिकारी पदाचा कार्यभार स्वीकारला आहे. त्यांच्याकडून या प्रकरणात तत्काळ लक्ष घालून कडक कारवाई करण्याची जनतेची अपेक्षा आहे.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!