रेशन माफिया तथा हाफ मर्डरचा फरार आरोपी महेंद्र बोरसेसह त्याचा भाऊ विनोद बोरसे यालाही अटक करा…

0

सुरेश पाटील यांची पत्रकार परिषदेच्या माध्यमातून प्रशासनाकडे मागणी

अमळनेर : तालुक्यातील सुंदरपट्टी येथील माजी सरपंच सुरेश पाटील यांचा मुलगा गोपाल उर्फ उमाकांत पाटील यांच्यावर झालेल्या चाकू हल्ल्यात अमळनेर येथील रेशन माफिया महेंद्र बोरसे हा व त्याचा भाऊ विनोद बोरसे पोलिसांच्या तपासात आरोपी निष्पन्न झाला आहे. या दोघांना फरार होऊन सुमारे एक महिना उलटत आला मात्र त्यांना अजून अटक नाही म्हणून सुरेश पाटील यांनी काल मंगळवारी पत्रकार परिषदघेत महेंद्र बोरसे व त्याचा भाऊ विनोद बोरसे या दोघांना अटक व्हावी अशी मागणी प्रशासनाकडे केली आहे.

या बाबत सविस्तर वृत्त असे की, मागील एका भांडणाच्या कारणावरुन गोपाल उर्फ उमाकांत सुरेश पाटील (रा. सुंदरपट्टी, ता. अमळेनर) हा तरुण १७ रोजी जळगाव येथून न्यायालयीन कोठडीतून जामीनावर सुटका होऊन अमळनेरकडे मोटारसायकलीने येत असताना मुसळी गावाच्या पुढे सुमारे १ किमी अंतरावर अगोदरच उभे असलेल्या सागर ज्ञानेश्वर खैरनार, विजय रमेश देवरे आणि आकाश उर्फ राघव नंदू जाधव या तिघांनी गोपालवर जीवे ठार मारण्याच्या उद्देशाने चाकू सारख्या हत्याराने डोक्यावर, पाठीवर व कानावर हल्ला केला. त्यात गोपाल हा गंभीर जखमी झाला होता. त्याला तात्काळ उपचारार्थ धुळे येथील खाजगी रुग्णालयात दाखल केले होते. गोपालवर अजूनही उपचार सुरू आहेत. याप्रकरणी गोपालचा मामा किशोर दिलभर पाटील याने दिलेल्या फिर्यादीवरुन १७ रोजी धरणगाव पोलिसांत महेंद्र शालिग्राम बोरसे व अज्ञातांविरुद्ध गुन्हा दाखल झाला होता. पोलिसांच्या तपासात जळगाव स्थानिक गुन्हे शाखेतर्फे ३१ ऑगस्ट रोजी सागर ज्ञानेश्वर खैरनार, विजय रमेश देवरे आणि आकाश उर्फ राघव नंदू जाधव या तिघांना अटक केली. पोलिसांनी अधिक तपास केला असता महेंद्र बोरसे याचा लहान भाऊ विनोद बोरसे हा देखील त्या चाकूहल्ल्यात सहभागी असल्याचे निष्पन्न झाले. त्यानुसार विनोद बोरसे याच्यावरदेखील धरणगाव पोलिसात कलम १०९(१) ३ (५) नुसार गुन्हा दाखल झाला आहे. मात्र तोदेखील फरार झाला असून पोलिस दोन्ही भावांच्या मागावर आहेत. मात्र त्यांना अजून अटक झालेली नाही म्हणून त्याना अटक व्हावी अशी मागणी सुरेश पाटील यांनी पत्रकार परिषदेच्या माध्यमातून केली आहे.

विनोद बोरसे हा सात्री गावाचा पोलिस पाटील असून गावातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्याची जबाबदारी त्याच्या हाती असून शिवाय शासनाचा महत्त्वाचा समजला जाणारा दुवा असूनही त्याने या गुन्ह्यात हस्तक्षेप करुन एकप्रकारे त्याने कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण केला आहे. सात्री गाव अगोदरच पुनर्वसनासाठी शासनदरबारी पाठपुरावा करत आहे. शिवाय सद्या पावसाळ्याचे दिवस असल्याने बोरी नदीला पुर आल्यास सात्री गावाचा संपर्क तालुक्याशी तुटतो. त्यात गावाचा पोलिस पाटील विनोद बोरसे हा फरार आहे. अशाप्रसंगी गावात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास मोठी समस्या निर्माण होऊ शकते. अशी भीती गावकऱ्यांनी व्यक्त केली आहे. असे सुरेश पाटील यांनी म्हटले आहे.

अमळनेर येथील मराठा समाजाच्या कार्यक्रमाच्या बॅनरवर फरार आरोपी महेंद्र बोरसे याचा फोटो असल्याने तो मराठा समाज मंगलकार्यालय बॉडीच्या संपर्कात आहे की काय अशी शंका देखील सुरेश पाटील यांनी व्यक्त केली आहे. तसेच महेंद्र बोरसे हा सध्या 10 दुकाने चालवत आहे व त्यात घोळ करून तो लाखो रुपये कमवत असतो तर तो यातून मोठा माफिया झाला असल्याचा देखील आरोप त्यांनी पत्रकार परिषदेत केला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!