चोपडा रोडवरील शनिपेठ पेट्रोल पंपजवळ रस्त्याची दुरावस्था ; PWD चे कारभारावर प्रश्नचिन्ह ?
खड्ड्यांचे साम्राज्य, वाहनधारकांना करावी लागते तारेवरची कसरत
अमळनेर : शहरातील चोपडा रोड शनीपेठ पेट्रोल पंपासमोरील रस्त्यावर खड्ड्याचे मोठे साम्राज्य निर्माण झाले असून याकडे सार्वजनिक बांधकाम विभागाने लक्ष देण्याची गरज आहे.
हा मेहरगाव – चोपडा राज्य मार्ग असून सार्वजनिक बांधकाम विभाग अमळनेरच्या (PWD) अखत्यारीत येतो रस्त्याची अत्यंत दैनिय अवस्था झाली असून, नागरिक व वाहनधारकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे. रस्त्यावर ठिकठिकाणी मोठ-मोठे खड्डे पडले असून, सांडपाणी खड्ड्यांमध्ये साचल्याने रस्त्यावरून मार्ग काढणे वाहनधारकांसाठी धोकादायक बनले आहे.
खड्ड्यात रस्ता की रस्त्यात खड्डा ?
पाऊस व इतर सांडपाण्यामुळे चिखल निर्माण होत असल्याने दुचाकीस्वारांचे वाहन घसरण्याची शक्यता वाढली आहे. अनेक ठिकाणी रस्त्यावर खडी व माती पसरलेली दिसून येते,साचलेल्या पाण्यामुळे रस्त्यावरील खड्ड्यांचा अंदाज लक्षात येत नसल्याने अपघाताचा धोका अधिकच वाढला आहे.

अवजड वाहनांच्या वाहतुकीचा परिणाम
या मार्गावरून दुचाकी, चारचाकी तसेच अवजड वाहनांची मोठ्या प्रमाणात ये-जा असते. सततच्या वाहतुकीमुळे रस्त्याची अवस्था दिवसेंदिवस खराब होत असून, रस्त्याची योग्य देखभाल व दुरुस्ती होत नसल्याने नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे.
सार्वजनिक बांधकाम विभागाने तातडीने लक्ष द्यावे
महत्त्वाच्या मार्गाची अशी अवस्था झालेली असताना सार्वजनिक बांधकाम विभाग एखाद्या अपघाताच्या व जीवित हानीच्या प्रतीक्षेत आहे का ? असा सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे. केवळ खड्ड्यांमध्ये मुरूम किंवा खडी टाकून तात्पुरती मलमपट्टी करण्याऐवजी रस्त्याची पाहणी करून दर्जेदार व कायमस्वरूपी डांबरीकरण करावे, अशी मागणी होत आहे.

महेश संदानशिव
अमळनेर ब्युरो
