कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिक महापालिका आरोग्य यंत्रणा अधिक सतर्क

0
IMG-20260902-WA0016

रुग्णालयांच्या तयारीचा अतिरिक्त आयुक्तांकडून आढावा

 

नाशिक जिल्हा प्रतिनिधी : नाशिकमध्ये आगामी कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर महापालिका प्रशासनाकडून आरोग्य व्यवस्थेच्या तयारीला वेग देण्यात आला आहे. कुंभमेळ्याच्या काळात शहरात मोठ्या प्रमाणावर भाविक दाखल होण्याची शक्यता लक्षात घेता, रुग्णालयांमधील सुविधा, आवश्यक मनुष्यबळ आणि आपत्कालीन व्यवस्थेचा आढावा घेण्यास सुरुवात झाली आहे.

महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त अमित रंजन यांनी इंदिरा गांधी रुग्णालयाला भेट देत तेथील आरोग्य सुविधांची प्रत्यक्ष पाहणी केली. यावेळी OPD, IPD, औषध भांडार, प्रयोगशाळा तसेच अतिदक्षता विभागाची पाहणी करण्यात आली. उपलब्ध साधनसामग्री आणि रुग्णसेवेसाठी असलेल्या व्यवस्थेचा यावेळी आढावा घेण्यात आला.

रुग्णालयातील पायाभूत सुविधांच्या दृष्टीनेही महत्त्वाचे निर्देश देण्यात आले आहेत. बांधकाम आणि विद्युतविषयक कामे ४ सप्टेंबरपर्यंत सुरू करण्याचे आदेश संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत. तसेच ICU विभागाच्या सुरक्षेसाठी आवश्यक असलेली अग्निशमन यंत्रणा कार्यान्वित करून ती सज्ज ठेवण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत.

दरम्यान कुंभमेळ्याच्या कालावधीत नाशिकमध्ये मोठ्या संख्येने भाविक आणि नागरिकांची गर्दी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे आरोग्य व्यवस्थेवर अतिरिक्त ताण निर्माण होऊ शकतो. अशा परिस्थितीत कोणत्याही आपत्कालीन प्रसंगाला तातडीने सामोरे जाण्यासाठी रुग्णालयांमध्ये मनुष्यबळ, औषधसाठा, उपचार सुविधा आणि आपत्कालीन सेवा पुरेशा प्रमाणात उपलब्ध ठेवण्यावर प्रशासनाचा भर आहे.

याच पार्श्वभूमीवर तपोवन येथील प्रस्तावित रुग्णालयाच्या कामाचीही अतिरिक्त आयुक्त अमित रंजन यांनी पाहणी केली. या प्रकल्पाच्या प्रगतीचा आढावा घेत आगामी कुंभमेळ्याच्या गरजा लक्षात घेऊन आरोग्य सुविधांचे नियोजन करण्यावर भर देण्यात येत आहे.

नाशिक महापालिकेची आरोग्य यंत्रणा कुंभमेळ्यासाठी सज्ज करण्याच्या दृष्टीने विविध पातळ्यांवर काम सुरू असून, रुग्णालयातील आवश्यक कामे वेळेत पूर्ण होतात का आणि आरोग्य सुविधा प्रत्यक्षात किती सक्षम होतात, याकडे आता सर्व सामान्य जनतेचे लक्ष लागले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!