मुलींची विक्री व आदिवासी मुलींचे इतर समाजात लग्न
आदिवासी समाजाचे प्रांत अधिकाऱ्यांना निवेदन
अमळनेर : आदिवासी समाजातील मुलींची विक्री तसेच आदिवासी मुलींचे इतर समाजात लग्न लावून देण्याच्या प्रकारांबाबत आदिवासी समाजाच्या वतीने प्रांताधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले.
आदिवासी समाजातील मुलींची विक्री करणाऱ्या तसेच मुलींचे इतर समाजात लग्न लावून देणाऱ्या व्यक्तींशी समाजाचा कोणताही संबंध राहणार नाही. तसेच ज्या समाजामध्ये मुलगी दिली आहे, त्या समाजामध्ये संबंधित व्यक्तींना समाविष्ट करण्यात यावे आणि आदिवासी समाजातून त्यांचा बहिष्कार करण्यात यावा, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली.
दरम्यान, आदिवासी समाजातील विद्यार्थी आपल्या विविध मागण्यांसाठी नाशिक येथे उपोषण करत असून, त्यांच्या आंदोलनाला पाठिंबा देत त्यांच्या मागण्यांकडे शासनाने तातडीने लक्ष द्यावे, अशी मागणीही करण्यात आली. मागण्यांची दखल न घेतल्यास रास्ता रोको आंदोलन करण्यात येईल, असा इशारा निवेदनाद्वारे देण्यात आला.
यावेळी एकलव्य संघटनेचे उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष गुलाब बोरसे, अमळनेर तालुका अध्यक्ष भैय्या सोनवणे, रावण ग्रुपचे अमळनेर तालुका अध्यक्ष नरेश चव्हाण, एकलव्य संघटनेचे उपाध्यक्ष आबा बहिरम, ज्येष्ठ कार्यकर्ते धनराज मालचे, ढेकू गावाचे ज्येष्ठ कार्यकर्ते रावसाहेब पवार, एकलव्य संघटनेचे जिल्हा सल्लागार विनायक सोनवणे, ज्येष्ठ कार्यकर्ते खैरनार, पारधी समाजाचे कार्यकर्ते भुरा पारधी, नितीन भाऊ यांच्यासह अनेक समाजबांधव उपस्थित होते.
