अंतिम टप्प्यात अंमळनेरचा प्रचार – दादा पवार आणि विसपुते यांच्या प्रचाराला वेग
सामाजिक कार्य आणि जनजागृतीद्वारे उमेदवारांचे मतदारांशी नाते

अमळनेर : नगरपरिषद निवडणुकीचा प्रचार अंतिम टप्प्यात पोहोचला असून विविध प्रभागांत प्रचाराची रंगत वाढत आहे. प्रभाग 17 मध्ये शिवसेना पक्षाचे अधिकृत उमेदवार साहेबराव वसंतराव पवार उर्फ दादा पवार यांनी प्रचारात आघाडी घेतल्याचे दिसून येत आहे. दादा पवार यांनी शिवसेना तालुका प्रमुख, शहरप्रमुख अशी जबाबदारी पार पाडली असून दोन वेळा नगरसेवक म्हणून कार्यरत असताना बांधकाम, शिक्षण आणि विविध विकासकामे केली आहेत.
सामाजिक कार्यातील आवड, गरजूंना आर्थिक मदत, तसेच गेली 31 वर्षे प्रभागात कीर्तन सोहळ्यांचे आयोजन करून जनजागृती करण्याचे त्यांचे कार्य उल्लेखनीय आहे. गणेशोत्सव, दुर्गा उत्सवातही त्यांचा सक्रिय सहभाग असल्याने मतदारांमध्ये त्यांना चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे स्थानिक स्तरावर बोलले जात आहे. त्यांचे निवडणूक चिन्ह धनुष्यबाण असल्याने कार्यकर्त्यांमध्ये उत्साह पाहायला मिळत आहे.
दरम्यान, प्रभाग 17 – अ मध्ये भावना कैलास विसपुते यांनी अपक्ष उमेदवार म्हणून रिंगणात उतरून लोकशाही जिवंत ठेवण्यासाठी उमेदवारी केल्याची चर्चा आहे. प्रतिस्पर्धी उमेदवारांकडून काही इच्छुकांवर उमेदवारी मागे घेण्याबाबत दबाव टाकल्याच्या चर्चा होत असताना विसपुते यांनी आपल्या बागडा या निवडणूक चिन्हासह जोरदार प्रचाराला सुरुवात केली असून मतदारांशी थेट संवाद साधण्यावर भर दिला आहे.
नगरपरिषद निवडणूक जसजशी जवळ येत आहे, तसतसे प्रभागांतील स्पर्धा अधिक रंगतदार होत आहे. तर दादा पवार व भावना विसपूते यांना मतदारांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.
