अमळनेर नगर परिषद निवडणुकीत प्रतिभा गजरे यांना जनतेचा प्रतिसाद
उच्चशिक्षित उमेदवारीमुळे महिलांपासून तरुण मतदारांपर्यंत सकारात्मक प्रतिसाद

अमळनेर : आगामी नगर परिषद निवडणुकीत प्रतिष्ठेच्या या लढतीसाठी विविध पक्ष आणि उमेदवार तयारीला लागले असताना आम आदमी पक्षाच्या उमेदवार प्रतिभा गजरे यांच्या प्रभाग 6 मधील उमेदवारीने शहरात विशेष चर्चा रंगली आहे. अर्ज प्रचारात नागरिक, महिलावर्ग तसेच तरुण मतदारांकडून त्यांना मोठा प्रतिसाद मिळत असल्याचे चित्र दिसत आहे.
उच्चशिक्षित, अभ्यासू आणि सरळ प्रतिमेच्या उमेदवार म्हणून प्रतिभा गजरे यांची ओळख आहे. शहरातील मूलभूत समस्या, विकासकामांची गती आणि स्वच्छ प्रशासनाची गरज ओळखून त्या निवडणूक रिंगणात उतरल्या आहेत. नागरिकांशी संवाद साधताना त्यांनी विकासाचा अजेंडा ठामपणे मांडला असून स्वच्छता, पाणीपुरवठा, रस्ते, महिलांसाठी सुरक्षा व सक्षमीकरण, तसेच तरुणांसाठी रोजगाराच्या संधी वाढविण्यावर त्यांचा विशेष भर असेल, असे त्यांनी स्पष्ट केले.
उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर अनेक नागरिकांनी त्यांची भेट घेत समर्थन दर्शवले. “प्रभागाच्या विकासासाठी शिक्षित व दूरदृष्टी असलेले नेतृत्व आवश्यक आहे. प्रतिभा गजरे या त्या निकषाला पूर्ण उतरतात,” असे मत मतदारांनी व्यक्त केले आहे. महिलांमध्येही त्यांच्या उमेदवारीबद्दल मोठा उत्साह असून, त्यांनी स्थानिक समस्यांवर सखोल अभ्यासाने उपाययोजना मांडाव्यात, अशी अपेक्षा नागरिकांनी व्यक्त केली.
गजरे यांनी जनतेचा मिळत असलेला हा प्रतिसाद ही आपली जबाबदारी असल्याचे नमूद करत, “अमळनेरचा सर्वांगीण विकास हा माझ्या प्रचाराचा मुख्य आधार असेल. स्वच्छ, पारदर्शक आणि जनसंपर्कावर आधारित प्रशासन देण्याचा प्रयत्न करू,” असे सांगितले.
