अमळनेरमध्ये राजकीय दबावाची चर्चा
कार्यकर्त्यांना धमकावल्याचे आरोप
स्वतःची चांगली प्रतिमा शाबूत ठेवण्यासाठी धमक्या देणे थांबवावे…

अमळनेर : स्थानिक स्वराज्य निवडणुकीचे राजकारण तापले असताना अमळनेरमध्ये काही मोठे राजकीय पुढारी स्वतःच्या स्वार्थासाठी राजकीय सीमारेषा ओलांडत असल्याचा आरोप स्थानिक कार्यकर्त्यांकडून होत आहे. “स्वार्थ आड आला की माणूस कोणतीही मर्यादा ओलांडू शकतो,” अशी प्रतिक्रिया काही जाणकारांकडून व्यक्त होत आहे. त्यांच्या मते, या स्वार्थी राजकारणामुळेच स्थानिक पातळीवरील वातावरण दूषित होत आहे.
काही उमेदवारांना साथ देऊ नये म्हणून दबाव?
स्थानिक पातळीवरील काही कार्यकर्त्यांनी ‘दिव्य लोकतंत्र’शी बोलताना असा दावा केला की, अमळनेरमधील काही प्रस्थापित नेते विशिष्ट उमेदवारांना विरोध करू नये किंवा समर्थन देऊ नये म्हणून छोट्या कार्यकर्त्यांवर दबाव टाकत आहेत.
एका कार्यकर्त्याने सांगितल्याप्रमाणे, एका वरिष्ठ पुढाऱ्याने त्याला थेट फोन करून “तुला तुझा व्यवसाय सुरळीत चालवायचा असेल तर जास्त बाहेर लक्ष देऊ नकोस” असा इशारा दिल्याचे आरोप आहेत.
फक्त व्यावसायिकांनाच नव्हे तर शासकीय-नौकरदार वर्गालाही अशाच प्रकारच्या धमक्या मिळत असल्याचे समोर येत आहे.
“हुकूमशाहीचे वातावरण” – नागरिकांमध्ये नाराजी
स्थानिक नागरिकांमध्ये याबाबत नाराजी असून काहींचे म्हणणे आहे की अमळनेरमध्ये हळूहळू “हुकूमशाहीचे राजकारण” आकार घेत आहे.
कार्यकर्त्यांचे म्हणणे आहे की, पुढाऱ्यांनी आपल्या सहकाऱ्यांकडे ‘गुलाम’ म्हणून नव्हे तर ‘परिवाराचा सदस्य’ म्हणून पाहिले पाहिजे. मात्र सध्याची परिस्थिती उलट दिशेने जात असून यामुळे अनेक कार्यकर्ते नेत्यांपासून दुरावत असल्याचे दिसत आहे.
स्थानीय संस्थांवरील सत्ता मिळवण्याचे डोहाळे
ज्येष्ठ नेत्यांनी साधारणपणे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका कार्यकर्त्यांवर सोडाव्यात अशी अपेक्षा असते. परंतु अमळनेरमध्ये वरिष्ठ राजकीय व्यक्तींनाच लहान संस्थांच्या निवडणुकांमध्येही थेट हस्तक्षेप करण्याची इच्छा वाढल्याचा आरोप काही राजकीय निरीक्षकांकडून येत आहे.
यामुळे स्थानिक राजकारणातील स्पर्धा तर वाढत आहेच, शिवाय कार्यकर्त्यांवरचा दबावही तीव्र होत असल्याचे दिसून येत आहे.
“धमक्या देणे थांबवावे” – दिव्य लोकतंत्रची भूमिका
दिव्य लोकतंत्रने या संपूर्ण घडामोडींवर प्रतिक्रिया देताना असे म्हटले आहे की, वरिष्ठ नेत्यांनी कार्यकर्त्यांना धमकावणे तात्काळ थांबवावे. लोकशाहीच्या प्रक्रियेत प्रत्येक कार्यकर्त्याला स्वातंत्र्य असणे आवश्यक आहे. “नेत्यांनी आपल्या कार्यकर्त्यांच्या निवडणुका त्यांनाच लढू द्याव्यात आणि स्वतःची प्रतिमा शाबूत ठेवावी, हीच समाजाची अपेक्षा आहे,” असे दिव्य लोकतंत्रने नमूद केले.
