प्रभाग 8 मध्ये उमेदवार बिनविरोध
लोकशाहीची गळचेपी?
NOTA पर्यायासह मतदान घेण्याची मागणी

अमळनेर : नगरपालिकेच्या प्रभाग 8 मध्ये एकाच जागेवर उमेदवार बिनविरोध निवडून आल्याने स्थानिक राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. शहर विकास आघाडीचे सचिन पाटील हे उमेदवार अखेर बिनविरोध झाल्याचे समजताच “प्रभागातील लोकशाहीचाच गळा कापला गेला” अशी तीव्र प्रतिक्रिया नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे.
प्रभाग 8 मधून सुरुवातीला या जागेसाठी 3 ते 4 उमेदवारांनी अर्ज दाखल केले होते. मात्र नामनिर्देशन मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी सर्व प्रतिस्पर्धी उमेदवारांनी अचानक माघार घेतल्याने परिस्थितीच पालटली. विशेषत: माजी नगरसेवक विवेक पाटील यांनी तिकीट न मिळाल्याबद्दल नाराजी व्यक्त करत “मी माघार घेणार नाही” अशी ठाम भूमिका घेतली होती. पण अंतिम क्षणी त्यांनीही अर्ज मागे घेतल्याने अनेक प्रश्नचिन्हे निर्माण झाली आहेत.
स्थानिकांचा आरोप आहे की, “ही माघार नैसर्गिक नसून, काहींनी हात भरले आणि जनतेच्या भावनांशी खेळ करण्यात आला”. त्यामुळे या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी व्हावी, अशी मागणी होत आहे.
याशिवाय बिनविरोध विजयी झालेले सचिन पाटील हे शालार्थ आयडी घोटाळ्याचे संशयित आरोपी अविनाश पाटील यांचे बंधू असल्यानेही नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत आहे. अविनाश पाटील यांना सध्या पोलिसांनी अटक केलेली आहे.
शिक्षित मतदार असलेल्या प्रभाग 8 मध्ये उमेदवार बिनविरोध ठरणे ही लोकशाहीची घोर अवहेलना असल्याचे मत व्यक्त होत असून, या प्रभागातील मतदारांना आपले मत व्यक्त करता यावे म्हणून NOTA पर्यायासह मतदान घेण्यात यावे, अशी मागणी निवडणूक आयोगाकडे करण्यात येणार आहे.
