लग्नात नाचताना २५ वर्षीय तरुणाचा मृत्यू
नालखेडा गावावर शोककळा

अमळनेर : नालखेडा गावात आनंदाचा सोहळा क्षणात दु:खाच्या छायेत बदलला. लग्नात नाचताना २५ वर्षीय तरुणाचा मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना शुक्रवारी रात्री घडली असून, या अचानक धक्क्याने संपूर्ण गाव शोकसागरात बुडाले आहे.
सविस्तर वृत्त असे की, अमळनेर जांभोरा (ता. धरणगाव) येथून सध्या नालखेडा (ता. अमळनेर) येथे वास्तव्यास असलेला अतुल ज्ञानेश्वर कोळी (वय २५) हा तरुण आपल्या नातलगाच्या लग्नात आनंदाने नाचत असताना अचानक खाली कोसळला. उपस्थितांनी तातडीने त्याला दवाखान्यात दाखल केले, मात्र डॉक्टरांनी तपासणीअंती त्याला मृत घोषित केले.
क्षणात आनंदाचा जल्लोष थांबला आणि जागोजागी हंबरडा फोडला गेला.
अतुलच्या अचानक जाण्याने कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. घरात एकुलता एक मुलगा… आई-वडिलांचा आधार होता, आता आई वडिलांच जगणं उद्याच्या एका क्षणात भकास झाले.
आई-वडिलांची दुनिया उघडी पडली आहे.
लग्न घरातली प्रकाशमय दिवाळी क्षणात काळोखात बदलली. गावात सर्वत्र हळहळ व्यक्त होत असून अतुलच्या निधनाने नालखेडा गावावर शोककळा पसरली आहे.
तरुण वयात असा अनपेक्षित मृत्यू हृदय पिळवटून टाकणारा आहे.
