प्रभाग १८ मध्ये आचारसंहितेचे उल्लंघन?
मुलगी उमेदवार असताना वडिलांकडून मोफत डोळे तपासणी शिबिर

अमळनेर : स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांची आचारसंहिता लागू असताना अमळनेर शहरातील प्रभाग १८ मध्ये आचारसंहितेचे उल्लंघन होत आहे. या प्रभागात उमेदवार असलेल्या मुलीच्या प्रचाराच्या पार्श्वभूमीवर तिचे वडील पांडुरंग दोधु भोई यांनी मोफत डोळे तपासणी शिबिराचे आयोजन केले असल्याचे सूत्रांनी सांगितले आहे.
शहरातील पंचमुखी महादेव मंदिर परिसरात हे शिबिर घेण्यात आले आहे. धार्मिक स्थळासह शासकीय जागेचा उपयोग करून शिबिर घेण्यात आल्याने आचारसंहितेचे उल्लंघन झाल्याची बाबही स्थानिकांमध्ये चर्चेचा विषय ठरत आहे. मोफत सुविधा देऊन मतदारांना आकर्षित करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप नागरिकांकडून करण्यात येत असून निवडणूक प्रशासनाने अशा प्रकारांकडे गांभीर्याने पाहण्याची गरज व्यक्त केली जात आहे.
या प्रकरणावर अद्याप अधिकाऱ्यांची अधिकृत प्रतिक्रिया मिळालेली नाही. मात्र निवडणुकीच्या पारदर्शकतेसाठी अशा घटनांवर कारवाईची मागणी होत आहे.
