विधानसभेत भूमिपुत्र तर नगरसेवक पदासाठी चोपड्याचे पुत्र?”
माजी नगरसेवकाच्या व्हॉट्सअॅप स्टेटसने राजकीय वर्तुळात खळबळ

अमळनेर : नगरपरिषद निवडणुकीत तिकिटवाटपाच्या पारदर्शकतेवरून नाराजी उफाळून येत असतानाच गुरुवारी रात्री एका माजी नगरसेवकाने ठेवलेल्या व्हॉट्सअॅप स्टेटसने अमळनेरच्या राजकीय वातावरणात अचानक खळबळ उडाली आहे.
निवडणुकीत तिकीट न मिळाल्याने अनेक इच्छुक नाराज आहेत. काही ठिकाणी बंडखोरीचे संकेतही दिसत असताना, या व्हॉट्सअॅप स्टेटसने चर्चांना नव्या दिशा दिल्या आहेत.
सदर माजी नगरसेवकाने आपल्या स्टेटसमध्ये सवाल उपस्थित केला आहे की, “विधानसभा निवडणुकांमध्ये भूमिपुत्र संकल्पना महत्त्वाची मानली जाते, तर मग स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत अमळनेरऐवजी चोपड्यातील असून काही वर्षांपूर्वी येथे स्थायिक झालेल्या व्यक्तीस नगरसेवकपदाची उमेदवारी कशी दिली जाते?”
या विधानानंतर शहरात उलटसुलट चर्चा सुरू झाल्या असून पक्षांतर्गत नाराजी किती खोलवर आहे, याची प्रचिती यामुळे आली आहे. स्थानिक कार्यकर्त्यांच्या रोषाला हे स्टेटस आणखी खतपाणी घालणारे ठरले असून आगामी राजकीय घडामोडीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
