प्रभाग क्र. 6 ‘अ’ मधून आम आदमी पक्षाकडून प्रतिभा गजरे यांची उमेदवारी
निवडणूक होणार अधिक रंगतदार

अमळनेर : सामाजिक कार्याची आवड व लोकाभिमुख दृष्टीकोन यामुळे परिचित असलेल्या सौ. प्रतिभा सुधाकर गजरे यांनी अमळनेर नगरपरिषद निवडणुकीसाठी प्रभाग क्रमांक 6 ‘अ’ मधून आम आदमी पक्षाच्या उमेदवार म्हणून उमेदवारी दाखल केली आहे. त्यांच्या प्रवेशाने प्रभागातील राजकीय वातावरणात चांगलीच चर्चा रंगली आहे.
प्रतिभा गजरे या उच्चशिक्षित असून त्यांनी समाजकार्यात उच्च पदवी प्राप्त केली आहे. गेल्या काही वर्षांपासून त्या प्रभागातील विविध समस्यांवर सातत्याने काम करत असून, नागरिकांच्या अडचणींना वेळीच प्रतिसाद देण्याबाबत त्यांची ओळख निर्माण झाली आहे.
गजरे यांनी महिला सक्षमीकरण, महिलांमध्ये जनजागृती, आरोग्य विषयक उपक्रम, तसेच छोटे-मोठे लघुउद्योग आणि गृहउद्योगांना चालना देणे या क्षेत्रांतही उल्लेखनीय योगदान दिले आहे. विशेषतः स्वयंरोजगाराच्या माध्यमातून महिलांना सक्षम करण्यासाठी त्यांनी राबविलेल्या उपक्रमांचे कौतुक प्रभागातील महिलांनी केले आहे.
आम आदमी पक्षाकडून गजरे यांना उमेदवार करण्यामागील उद्दिष्ट म्हणजे प्रभागात स्वच्छ आणि पारदर्शक प्रशासन, तसेच स्थानिक प्रश्नांना प्राधान्य देऊन विकासकामे गतीमान करणे, असे पक्षाच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनी सांगितले.
निवडणूक प्रचाराची सुरुवात होताच प्रतिभा गजरे या घरोघरी भेट देत मतदारांशी संवाद साधत आहेत. प्रभागाचा सर्वांगीण विकास, महिलांसाठी अधिक संधी, तसेच नागरिकांच्या मूलभूत सुविधांमध्ये सुधारणा ही त्यांची प्रमुख आश्वासने असून, यामुळे आगामी निवडणुकीत त्यांची उमेदवारी अधिक बळकट झाली असल्याचे राजकीय निरीक्षकांचे मत आहे.
प्रभाग 6 ‘अ’ मधील नागरिकांनीही “काम करणारी उमेदवार” म्हणून प्रतिभा गजरे यांच्या उमेदवारीचे स्वागत केले आहे. आता त्यांच्या प्रचारामुळे प्रभागातील निवडणूक अधिक रंगतदार होणार आहे.
