दिव्य लोकतंत्रच्या दणक्याने प्रशासनाची धांदल; अमळनेरमध्ये स्थिर सर्वेक्षण पथकं अखेर वेळेवर हजर

0

वाहनांची कसून तपासणी सुरू; निवडणूक विभाग ‘अ‍ॅलर्ट मोड’वर

 

 

 

अमळनेर : नगर परिषद निवडणुकीच्या तोंडावर अमळनेर शहरातील निवडणूक विभागाच्या निष्क्रियतेवर दिव्य लोकतंत्रने वाजवलेला दणका अखेर रंगाला आला आहे. “स्थिर सर्वेक्षण पथकं झाली अस्थिर; ११ वाजेपर्यंत पथकातील कर्मचारी बेपत्ता, गाड्यांची तपासणी ठप्प, निवडणूक आयोगाचा भोंगळ कारभार” या शीर्षकाखाली काल प्रकाशित झालेल्या बातमीने जिल्हा प्रशासनाला जाग येताना दिसली.

दिव्य लोकतंत्रच्या बातमीची गंभीर दखल घेत जिल्हाधिकारी जळगाव तसेच अमळनेर मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी यांनी तातडीने चौकशीचे आदेश दिले. संबंधित कर्मचाऱ्यांकडून स्पष्टीकरण मागवण्यात आले असून त्यांना नोटीसही बजावण्यात आल्या आहेत. निवडणूक काळातील शिस्तभंगाला प्रशासनाने शून्य सहनशीलतेची भूमिका घेतल्याचे कळते.

आज सकाळी दिव्य लोकतंत्रच्या प्रतिनिधींनी पुन्हा दोन्ही चेकपोस्टना भेट दिली असता परिस्थितीत लक्षणीय बदल दिसून आला. कालपर्यंत गायब असणारे स्थिर सर्वेक्षण पथकांचे कर्मचारी आज सकाळपासून वेळेवर हजर होते. चेकपोस्टवर सतत वाहने थांबवून तपासणी करण्यात येत असून अमळनेर शहरात प्रवेश करणाऱ्या प्रत्येक वाहनाची बारकाईने चौकशी सुरू आहे.

पोलिस व निवडणूक विभागाचे कर्मचारी कर्तव्यावर सतर्क दिसत असून रोख रक्कम, मद्य, अवैध साहित्य किंवा मतदारांवर प्रभाव टाकण्यासाठी वापरता येईल असा कोणताही माल वाहतूक होत नाही ना, याची काटेकोर तपासणी केली जात आहे. शहरातील सर्व प्रवेशद्वारांवर कडक ‘वॉच’ ठेवण्यात आल्याने निवडणूक प्रक्रिया अधिक पारदर्शक व स्वच्छ होण्याची चिन्हे दिसत आहेत.

दिव्य लोकतंत्रच्या बातमीमुळे निष्क्रियतेवरून सक्रियतेकडे झालेला हा बदल स्पष्टपणे जाणवतो. पत्रकारितेचे सामाजिक उत्तरदायित्व आणि जनतेचा पहारेकरी म्हणून माध्यमांची भूमिका अधोरेखित करणारा हा प्रसंग ठरला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!