प्रभाग 12 मध्ये नगरसेवकपदासाठी सुधाम शिंगाणे उर्फ ‘आबा भोई’ रिंगणात
“नको कोणता पक्ष… जनता जनार्दनच माझा पक्ष!” म्हणत अपक्ष उमेदवारी दाखल

अमळनेर : आगामी नगरपरिषद निवडणुकीची रंगत दिवसेंदिवस वाढत असून विविध प्रभागांमध्ये अनेक नवीन चेहरे तसेच अनुभवी उमेदवार रिंगणात उतरत आहेत. नगरपरिषद हद्दीतील प्रभाग क्र. 12-ब मध्येही स्पर्धा चांगलीच चुरशीची होणार आहे. याच प्रभागातून सुदाम जगन्नाथ शिंगाणे लोकप्रियपणे ओळखले जाणारे आबा भोई, यांनी अपक्ष उमेदवारी दाखल करून राजकीय वर्तुळात नव्या चर्चांना सुरुवात केली आहे.
आबा भोई यांनी यापूर्वी शहर विकास आघाडीच्या तिकीटासाठी मागणी केली होती. मात्र उमेदवारी न मिळाल्याने, तसेच जनतेकडून मिळालेल्या प्रचंड आग्रहामुळे त्यांनी स्वतंत्रपणे अपक्ष म्हणून निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला. “नको कोणता पक्ष… जनता जनार्दनच माझा खरा पक्ष” असे म्हणत त्यांनी जनतेसमोर आपली भुमिका स्पष्ट केली आहे.
आबा भोई हे माजी मंत्री व विद्यमान आमदार अनिल पाटील यांचे जवळचे सहकारी व खंदे कार्यकर्ते म्हणून ओळखले जातात. सामाजिक बांधिलकी, संघटन कौशल्य आणि विविध समाजोपयोगी उपक्रमांमुळे गेल्या काही वर्षांत त्यांनी युवकांमध्ये तसेच ज्येष्ठ नागरिकांमध्ये स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे.
शहरात धार्मिक, सांस्कृतिक तसेच सामाजिक क्षेत्रातील असंख्य उपक्रमांमध्ये त्यांनी सक्रिय सहभाग घेतला असून, समाजहितासाठी तत्परता हे त्यांचे वैशिष्ट्य मानले जाते. गरजू कुटुंबांना मदत, परिसरातील प्रश्न सोडविण्यासाठी केलेले पाठपुरावे, तसेच विविध समाजघटकांशी जोडलेले नाते यामुळे आबा भोई यांना स्थानिकांमध्ये उत्तम प्रतिसाद मिळत असल्याचे चित्र दिसत आहे.
प्रभाग 12-बमध्ये युवक मतदारांचा मोठा कल असल्याने आबा भोई यांच्या उमेदवारीमुळे या प्रभागात रंगत आणखी वाढणार असल्याचे जाणकारांचे म्हणणे आहे. पुढील काही दिवसांत प्रचार मोहीम जोर पकडणार असून, नागरिक कोणावर विश्वास टाकतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
