स्थिर सर्वेक्षण पथकं झाली अस्थिर…!
११ वाजेपर्यंत कर्मचारी बेपत्ता; गाड्या तपासणीविनाच मार्गस्थ
निवडणूक आयोगाचा भोंगळ कारभार उघड

अमळनेर : नगर परिषद निवडणुकीची धामधूम सुरू असताना अमळनेर शहरातील निवडणूक प्रशासनावरील प्रश्नचिन्ह अधिक ठळक झाले आहे. शहरात स्थिर सर्वेक्षणाची चार पथके असून दिवस-रात्र मिळून आठ पथकांचे नियुक्ती आदेश आहेत. परंतु वास्तवात ही पथके स्थिर राहण्याऐवजी अक्षरशः अस्थिर झाल्याची चित्रे निदर्शनास येत आहेत.
स्थिर सर्वेक्षण पथकांचे काम म्हणजे निवडणुकीदरम्यान वाहतुकीतून होणारी अवैध देवाणघेवाण, रोख रक्कम, दारू, प्रचार साहित्य किंवा मतदारांवर प्रभाव टाकणारा कोणताही माल जाऊ नये म्हणून काटेकोर तपासणी करणे. मात्र अमळनेरमध्ये ही तपासणीच होत नसल्याचे प्रत्यक्ष निरीक्षणातून स्पष्ट झाले आहे.
दिव्य लोकतंत्रने धुळे रोड व गलवाडे रोडवरील स्थिर सर्वेक्षण चौक्यांना भेट दिली असता धक्कादायक बाब समोर आली. सकाळी ११ वाजेपर्यंतही पथकातील एकाही कर्मचाऱ्याची उपस्थिती नव्हती. चौकी ओसाड, तपासणीची साधनं वापरात नसलेली आणि नियंत्रणासाठी कोणताही कर्मचारी नसल्यामुळे वाहनांची ये-जा तपासणीविना सुरू होती.
निवडणूक काळात अशी वागणूक गंभीर गैरव्यवस्थेचे द्योतक असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.
“निवडणुकीसारख्या संवेदनशील काळात पथकंच नसतील तर आचारसंहितेचा काय फायदा?” असा सवाल जनतेतून उपस्थित होत आहे.
या घटनेवरून अमळनेर निवडणूक विभागाची उदासीनता आणि निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांचे पथकांवरील नियंत्रण ढासळल्याचे स्पष्ट दिसते. पथके उपस्थित नसणे, पर्यवेक्षणाचा अभाव आणि नियोजनातील त्रुटी यामुळे संपूर्ण निवडणूक प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
नागरिकांकडून निवडणूक आयोगाने तातडीने हस्तक्षेप करून पथकांची पुनर्तपासणी, जबाबदारांवर कारवाई आणि कडक नियंत्रण यंत्रणा उभारावी, अशी मागणी होत आहे.
