शहर विकास आघाडीत उमेदवारीवरून असंतोषाचा भडका; मोठ्या बंडाची चिन्हे
अमळनेर शहराच्या राजकारणात घडामोडी वेगाने; पक्षनेतृत्वावर नाराजीचा ठिणगी वणवा बनण्याची शक्यता

अमळनेर : शहरात नगरपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहर विकास आघाडीत मोठे राजकीय वादळ उठण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. उमेदवारी जाहीर करण्याच्या प्रक्रियेत ‘आपलेच तिकीट निश्चित’ असल्याचे अनेकांना आश्वासन देणाऱ्या काही पुढाऱ्यांची पोलखोल आता हळू-हळू समोर येत असून, यामुळे पक्षातील निष्ठावान कार्यकर्त्यांत प्रचंड नाराजीचा सूर उमटू लागला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, काही महत्वाच्या प्रभागांत किमान तीन ते चार इच्छुक उमेदवारांनी गेल्या काही महिन्यांपासून आपापल्या क्षेत्रात जोरदार जनसंपर्क सुरू ठेवला होता. मात्र प्रत्यक्षात तिकीट फक्त एका व्यक्तीला देण्यात आल्याने उर्वरित उमेदवार संतापले आहेत. यापैकी अनेकांना ‘तिकीट तुमचेच’ असे आश्वासन देण्यात आले होते, अशी जोरदार चर्चा शहरभर रंगली आहे. त्यामुळे आघाडी नैतृत्वावर कार्यकर्त्यांचा विश्वास कमी होत असून ‘जोडपल्यात फसवणूक’ झाल्याची भावना आहे.
या नाराजीतून काही उमेदवारांनी एकला चलोचा मार्ग स्विकारला असून अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. तर काहींनी थेट विरोधी गटाशी हातमिळवणी करून शहर विकास आघाडीसमोर कठीण परिस्थिती उभी केली आहे. अपक्षांच्या वाढत्या बंडखोरीमुळे अधिकृत उमेदवारांची दमछाक होण्याची शक्यता राजकीय वर्तुळात व्यक्त होत आहे.
शहर विकास आघाडीला आधीच अंतर्गत गटबाजी, स्थानिक पातळीवरील वैयक्तिक वैर आणि विविध राजकीय समीकरणांमुळे अडथळ्यांचा सामना करावा लागत आहे. आता या वाढत्या बंडखोरीमुळे आघाडीची एकजूट धोक्यात आली असून, येत्या निवडणुकीत कठीण परीक्षेला सामोरे जावे लागणार असल्याचे स्पष्ट संकेत मिळत आहेत.
राजकीय जाणकारांच्या मते, “ही निवडणूक शहर विकास आघाडीसाठी अस्तित्वाचा प्रश्न ठरू शकते. उमेदवारी प्रक्रियेत झालेल्या चुकांचे पडसाद मतदान पेट्यांमध्ये उमटण्याची शक्यता नाकारता येत नाही,” असे मत व्यक्त केले जात आहे.
सध्या संपूर्ण शहरात या घडामोडींनी चांगलीच खळबळ उडाली असून, आघाडीतील नैतृत्व या नाराज उमेदवारांना कसे सामोपचाराने हाताळते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. आगामी काही दिवसांत चित्र अधिक स्पष्ट होईल.
