“8383 क्रमांकाच्या गाड्यांना ‘स्पेशल पास’? भ्रष्टाचाराचा येतोय तीव्र वास !”

0

उत्राण वरून येणाऱ्या गाड्यांवर लक्ष देण्याची गरज…

 

 

अमळनेर : एरंडोल तालुक्यातुन उत्राण येथून अमळनेर तालुक्यात येणाऱ्या वाळूच्या गाड्यांवर प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याचा गंभीर आरोप स्थानिकांमधून होत आहे. विशेष म्हणजे, 8383 हा क्रमांक असलेल्या सहा ट्रकांना अमळनेरमध्ये “विशेष सवलत” मिळाल्याचे बोलले जात असून, या सवलतीमागे मोठा आर्थिक व्यवहार झाल्याची शक्यताही वर्तवली जात आहे.

स्थानिक नागरिकांच्या मते, या गाड्या दिवस-रात्र सतत धाव घेत असून, त्या ओव्हरलोड वाळूने भरलेल्या असतात. वाळू उपसा आणि वाहतुकीवर सरकारकडून कठोर नियम असतानाही या गाड्यांवर कुठलाही कारवाईचा बोजा दिसत नाही.

पावत्यांमध्ये हेराफेरीचा संशय

मिळालेल्या माहितीनुसार, या गाड्यांच्या पावत्या आणि वाळू मोजमापांमध्ये मोठी हेराफेरी सुरू असल्याचेही उघड झाले आहे. वजनपत्रक आणि परवान्यांमध्ये फरक असल्याचे काही पुरावे स्थानिक कार्यकर्त्यांनी गोळा केले असल्याचे सांगितले जात आहे.

 

प्रशासनाचे मौन — हेतुपुरस्सर का?

अनेक वेळा या गाड्यांबाबत नागरिकांनी आणि समाजसेवकांनी स्थानिक प्रशासनाचे लक्ष वेधले, तरीही अद्याप कोणतीही ठोस कारवाई झालेली नाही. त्यामुळे प्रशासन जाणीवपूर्वक या प्रकरणाकडे दुर्लक्ष करीत असल्याचा संशय बळावत आहे.

स्थानिकांची मागणी

अमळनेर, एरंडोल आणि आसपासच्या परिसरातील नागरिकांनी जिल्हाधिकारी , तहसीलदार आणि पोलीस प्रशासनाने या प्रकरणाची तपासणी करून ओव्हरलोड वाहतुकीवर तात्काळ बंदी घालावी, अशी मागणी केली आहे. तसेच, जर आर्थिक व्यवहार किंवा भ्रष्टाचाराचे पुरावे आढळले, तर संबंधित अधिकाऱ्यांवर आणि ठेकेदारांवर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी होत आहे.

8383 क्रमांकाच्या सहा गाड्यांना अमळनेरमध्ये मिळालेली “विशेष सवलत” आता स्थानिकांमध्ये चर्चेचा विषय ठरली आहे. ओव्हरलोड वाजळू, हेराफेरीच्या पावत्या आणि प्रशासनाचे मौन — या सर्वामुळे भ्रष्टाचाराचा वास येत असून, जनतेने तातडीने कारवाईची मागणी केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!