उत्राण येथून अमळनेरात रात्रंदिवस वाळू वाहतूक; भरधाव डंपरमुळे धोका नागरिकांच्या जीवितास वाढला धोका

0

पत्रकाराच्या अंगावर डंपर घालण्याचा प्रयत्न…..

 

अमळनेर : एरंडोल तालुक्यातील उत्राण परिसरातून अमळनेर शहरात रोज मोठ्या प्रमाणावर वाळूची वाहतूक दिवस-रात्र सुरू आहे. प्रशासनाचे योग्य लक्ष नसल्यामुळे ही वाहतूक नियंत्रणाविना होत असून नागरिकांच्या सुरक्षेला गंभीर धोका निर्माण झाला आहे. विशेषतः रात्रीच्या वेळी भरधाव वेगात धावणारे डंपर हे जीवितहानीस आमंत्रण देत आहेत.

स्थानिक नागरिकांच्या तक्रारीनुसार, या मार्गावरून जाणाऱ्या डंपरांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून बहुतेक वाहने ओव्हरलोडेड (जास्त वाळू भरलेली) आहेत. त्यामुळे रस्त्यांची प्रचंड दुरवस्था झाली आहे. खड्डेमय रस्त्यांमुळे छोट्या वाहनचालकांना व पादचाऱ्यांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे.

शिवाय, या वाहतुकीत पावत्यांमध्ये हेराफेरी होत असल्याचेही उघड झाले आहे. वाळूची मोजणी आणि परवान्यांमध्ये फेरफार करून काही अवैधरीत्या वाळू वाहतूक केली जात असल्याची शक्यता व्यक्त होत आहे. यामुळे शासकीय महसुलाचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत असून, स्थानिक पातळीवर वाळू माफियांचा प्रभाव वाढत चालल्याची चर्चा रंगली आहे.

दरम्यान डंपरवर वेगमर्यादा लावावी, प्रत्येक वाहनाची पावती तपासणी करावी, अवैध वाळू उत्खनन व वाहतूक थांबवावी अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.

स्थानिक प्रशासनाने या गंभीर विषयाची दखल घेऊन त्वरीत उपाययोजना करणे अत्यावश्यक आहे. अन्यथा कधीही एखादी जीवितहानी घडल्यास त्याची जबाबदारी प्रशासनावरच टाकण्यात येईल, असा इशारा नागरिकांनी दिला आहे.

तर गेल्या दोन दिवसांपूर्वी एका पत्रकारांच्या अंगावर डंपर घालण्याचा प्रयत्न डंपर चालकाने केला होता.  म्हणून ह्या गाड्यांचा प्रशासनाने बंदोबस्त करावा अशी मागणी जिल्हाधिकारी जळगाव यांच्याकडे करण्यात येणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!