अमळनेरमध्ये धक्कादायक सायबर फसवणूक

0
Screenshot_2026-06-07-10-13-30-119_com.google.android.googlequicksearchbox-edit

OTP न येताच IDBI खात्यातून तब्बल ९५ हजार रुपये लंपास

 

अमळनेर  : अमळनेर नगरपरिषदेत कार्यरत असलेल्या एका कर्मचाऱ्याच्या बँक खात्यातून कोणताही OTP अथवा बँकेचा पुष्टीकरण कॉल न येता तब्बल ९४ हजार ९९९ रुपये ९७ पैसे सायबर गुन्हेगारांनी काढून घेतल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या प्रकारामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून बँकिंग सुरक्षेबाबतही प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, योगेश आधार पवार (वय ३२, रा. ताडेपुरा, अमळनेर) यांच्या IDBI बँक खात्यातून दिनांक ५ जून २०२६ रोजी सकाळी ११.३८ वाजता दोन स्वतंत्र व्यवहारांद्वारे रक्कम काढण्यात आली. पहिल्या व्यवहारात ५० हजार रुपये तर दुसऱ्या व्यवहारात ४४ हजार ९९९ रुपये ९७ पैसे असे एकूण ९४ हजार ९९९ रुपये ९७ पैसे परस्पर वळते करण्यात आले.

विशेष म्हणजे, या संपूर्ण व्यवहारादरम्यान पवार यांच्या मोबाईलवर कोणताही OTP प्राप्त झाला नाही किंवा बँकेकडून कोणताही पुष्टीकरण कॉल आला नाही. पैसे कपात झाल्याचा संदेश मोबाईलवर आल्यानंतर त्यांना फसवणुकीचा प्रकार लक्षात आला.

घटनेची माहिती मिळताच पवार यांनी आपल्या मित्रांना याबाबत कळविले. त्यानंतर अनंत संदानशिव यांनी तत्परता दाखवत राष्ट्रीय सायबर गुन्हे नोंदणी पोर्टलवर ऑनलाइन तक्रार दाखल केली. तक्रारीमध्ये व्यवहाराची वेळ, रक्कम आणि बँकेसंबंधी आवश्यक माहिती नोंदविण्यात आली असून त्यामुळे तपासाला मदत होणार असल्याचे सांगितले जात आहे.

दरम्यान, या प्रकरणाची माहिती मिळाल्यानंतर अमळनेर पोलीस ठाण्याचे राहुल चव्हाण यांनी तपास सुरू केला असून संबंधित व्यवहारांची चौकशी करण्यासाठी IDBI बँकेशी संपर्क साधण्यात आला आहे.

सायबर तज्ज्ञांच्या मते, अशा प्रकारच्या फसवणुकीमागे सिम क्लोनिंग, मोबाईल हॅकिंग, मालवेअर किंवा इतर तांत्रिक माध्यमांचा वापर असू शकतो. कोणताही OTP न येता व्यवहार झाल्याने या प्रकरणाकडे गांभीर्याने पाहिले जात असून बँकिंग सुरक्षेच्या यंत्रणेचीही कसून चौकशी होण्याची शक्यता आहे.

या घटनेमुळे ऑनलाइन व्यवहार करणाऱ्या नागरिकांनी अधिक सतर्क राहण्याची गरज व्यक्त केली जात आहे. पोलीस आणि सायबर विभागाकडून प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!