“‘मी तलाठ्यांना ठार मारीन!’ – आरोपीचा ऑडिओ लीक!”
सरकारी कामात अडथळा निर्माणबाबत दाखल गुन्ह्यातील आरोपीच्या “बड्या बातां”चा आहे ऑडिओ

अमळनेर : तालुक्यातील एका गंभीर प्रकरणात, तलाठ्यांना धमकावून सरकारी कामात अडथळा निर्माण करणाऱ्या आरोपीचा धक्कादायक ऑडिओ समोर आला आहे. “माझ्या आड आलेल्या तलाठ्यांना मी जीवे ठार मारून टाकेल,” या संभाषणाचे रेकॉर्डिंग ‘दिव्य लोकतंत्र’च्या हाती लागले आहे.
ही धक्कादायक वक्तव्ये करताना संबंधित आरोपी अत्यंत बेधडकपणे बोलताना आढळतो. तो पुढे म्हणतो, “तलाठ्यांनी माझ्याशी वाईट पणा घेतला, चुकीचे वागले, त्यामुळे त्यांना मी सोडणार नाही.” यावरून आरोपींच्या मनात प्रशासनाबद्दल असलेला संताप व कायद्याची भीती न उरलेले मानसिकतेचे स्पष्ट चित्र समोर येते.
सरकारी यंत्रणेवर उघड थेट हल्ला – पोलिसांची उदासीनता?
गेल्या काही दिवसांपूर्वी या प्रकरणात संबंधित आरोपींनी तलाठ्यांशी धक्काबुक्की केली, दमदाटी करत ट्रॅक्टर जबरदस्तीने पळवून नेले. यावरून अमळनेर पोलीस ठाण्यात सरकारी कामात अडथळा आणल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. परंतु, गुन्हा दाखल होऊनही संबंधित आरोपी अजूनही मोकाटच फिरत असून, त्यांच्या उद्दामपणात वाढ होत असल्याचे चित्र दिसून येत आहे. जर गुन्हा दाखल होताच संबंधित आरोपींना तात्काळ अटक झाली असती, तर कदाचित त्यांना कायद्याचा धाक वाटला असता आणि अशा प्रकारे खुलेआम धमक्या देण्याचे धाडस त्यांनी केले नसते.
प्रशासन व कायदा व्यवस्था यांच्यापुढील प्रश्नचिन्ह
हा प्रकार म्हणजे केवळ तलाठ्यांवरचा हल्ला नाही, तर संपूर्ण शासकीय यंत्रणेवरचा आणि कायदा व्यवस्थेवरचा एक प्रकारचा थेट हल्ला आहे. प्रशासनाला खुलेआम आव्हान दिले जात असताना पोलिसांची गळपडलेली भूमिका, हीही चौकशीचा विषय बनली पाहिजे.
