भ्रष्टाचाराच्या पैशाने अनेकांचा संसार सजला, म्हणून ठेकेदार माजला….
खेडीढोक पाणीपुरवठा योजना निकृष्ट
ठेकेदार व देखरेख करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी

पारोळा : भ्रष्टाचाराचा पैसा वाटला जातो तेव्हा लोकप्रतिनिधी, लोकसेवक अशा अनेकांचे घर म्हणजे संसार सजतो, आणि त्यामुळे ते निकृष्ट अथवा काही चुकीच्या कामाविरोधात ब्र सुद्धा काढू शकत नाहीत, आणि अशा सर्व कारणांमुळे ठेकेदार माजतो. याचे उदाहरण पारोळा तालुक्यातील खेडीढोक येथे आले आहे. खेडीढोक येथील जलजीवन मिशन योजनेचे काम निकृष्ट दर्जाचे झाले असून पाईपलाईन एक फूट खाली खोदून करण्यात आली आहे. अवघ्या काही महिन्यात ही पाईपलाईन अनेक वेळेस फुटली देखील असून गावकऱ्यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. या कामात अनेक ठिकाणी अनियमितता असून सदर कामाची चौकशी करून काम पुन्हा व्यवस्थित रित्या करावे व ठेकेदार तसेच देखरेख ठेवणाऱ्या अभियंता व इतर अधिकाऱ्यांवर कारवाई व्हावी अशी मागणी होत आहे.

खेडीढोक येथील जलजीवन मिशन योजनेचे काम गेल्या दोन वर्षांपासून सुरू आहे. पारोळा तालुक्यातील म्हसवे धरणावरून हे पाणी खेडीढोक येथे नेण्यात येत आहे. गेल्या दोन वर्षात विहीर खोदणे पाईपलाईन एक फूट खाली खोदणे अशा कामांना दोन वर्ष लागले आहेत. मध्ये ठेकेदार आजारी आहे, त्याची बिले निघाली नाहीत, अशा अनेक कारणांचा सामना करावा लागला. मात्र दोन वर्ष कामाला देऊनही सदर काम निकृष्ट होत असेल तर अधिकारी व इतरांवर बोट उठणे स्वाभाविक आहे. म्हणून तात्काळ ह्या कामाची चौकशी होऊन ठेकेदार व कामाची देखरेख ठेवणारा सरकारी अभियंता तसेच अधिकारी यांच्यावर कारवाई व्हावी अशी मागणी होत आहे.
दरम्यान कारवाई न झाल्यास येत्या 2 ऑक्टोबर रोजी पारोळा तहसील कार्यालयासमोर लाक्षणिक उपोषण केले जाईल असा इशारा देखील देण्यात आला आहे.
