अमळनेर गटशिक्षणाधिकाऱ्यांकडे बनावट अपंग प्रमाणपत्र ?
त्यांची अपंग प्रमाणपत्रानुसार शारीरिक तपासणी करण्याची कायदा पालन संघाची मागणी

अमळनेर : येथील गट शिक्षणाधिकारी चांगलेच वादात सापडले असून त्यांचे अपंग प्रमाणपत्र देखील बनावट असून त्यांची प्रमाणपत्रानुसार शारीरिक तपासणी करा म्हणजे “दुधाचे दूध आणि पाणीचे पाणी” होईल अशी मागणी कायदा पालन संघाने केली आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, अमळनेरचे प्रभारी गट शिक्षणाधिकारी रावसाहेब मांगो पाटील यांना डोळ्याचे ४० टक्के अपंगत्व असल्याचा दाखल त्यांनी आपल्या नौकरीच्या ठिकाणी दिला आहे. त्या अपंगत्वाच्या आधारावर त्यांनी सध्या विस्तार अधिकारी पद मिळवले व त्यांच्यापेक्षा वरिष्ठ अधिकारी असूनही अमळनेरचा गट शिक्षण अधिकारी पदाचा पदभार घेतला, तसेच शासनाचे अनेक लाभ घेतले असून अनेक गरजू लोक अपंगत्वाच्या या लाभापासून वंचित असल्याचा आरोप कायदा पालन संघाने केला आहे. रावसाहेब पाटील हे नौकरीला लागण्यापूर्वी अपंग नव्हते मात्र २०१० साली त्यांनी अपंगत्वाचे प्रमाणपत्र दिले ते फक्त काही वर्षातच असे कोणते अपंग झाले की त्यांना सरळ ४० टक्के अपंग असल्याचे प्रमाणपत्र दिले जाते असा प्रश्नही तक्रारीत त्यांनी उपस्थित केला आहे. म्हणून सर्व “दुधाचे दूध व पाण्याचे पाणी” होण्यासाठी रावसाहेब पाटील यांची तात्काळ शारीरिक तपासणी करावी तसेच त्यांच्यावर कारवाई करावी अशी मागणी लेखी पत्राद्वारे कायदा पालन संघाने केली आहे.

Very Good