तहसील कार्यालय ते महाराणा प्रताप चौक दरम्यान अपघात नियंत्रणासाठी उपाययोजनांची गरज….
दर दुसऱ्या दिवशी होतोय अपघात

अमळनेर : शहरातील तहसील कार्यालय ते महाराणा प्रताप चौक या भागादरम्यान गेल्या काही दिवसांपासून दर दुसऱ्या दिवशी एक अपघात होत असून याकडे प्रशासनाने लक्ष देऊन अपघात नियंत्रणासाठी उपाययोजना कराव्यात अशी मागणी होऊ लागली आहे.
गेल्या काही दिवसांपूर्वी चहाच्या दुकानावर काम करणाऱ्या एका मजुराला ठोकून एक व्यक्ती पळून गेला होता त्या मजुराच्या डोक्याला मार लागल्याने त्याला अमळनेर ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले होते. तर काल बुधवारी देखील एक महिला दुचाकीवर जात असतांना तिलाही उडवून एक चारचाकीवाला पळून गेला आहे. ही महिला जखमी झाल्याने तिला एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तर इतर लहान मोठे अपघात या भागात रोज होत आहेत.
जो पर्यंत काही जीवित हानी होत नाही तोपर्यंत प्रशासनाला जाग येणार नाही का ? असा सवाल यावेळी उपस्थित होत आहे. राज्य मार्ग सहा ज्यावेळी तयार झाला त्यावेळी अमळनेर तहसील कार्यालयाच्या बाहेर स्पीड ब्रेकर लावण्यात आले होते. मात्र ते निघाले आणि त्यानंतर आज पर्यंत तेथे स्पीड ब्रेकर लावले गेलेले नाहीत. म्हणून आता प्रशासनाने जागे होऊन तात्काळ अपघात नियंत्रणासाठी उपाययोजना कराव्यात अशी मागणी होत आहे.
