आगामी गणेशोत्सव व ईदच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने घेतली शांतता कमिटीची बैठक…
मोठ्या राजकीय पुढाऱ्यांची बैठकीस दांडी
तालुक्यात शांतता राहावी असे राजकीय मंडळींना वाटत नाही का ?

अमळनेर : तालुक्यात आगामी सण उत्सवात शांतता राहावी या उद्देशाने पोलीस प्रशासनाकडून बुधवारी शांतता कमिटीची बैठक घेण्यात आली. दोन्ही समाजांना सणांमध्ये निर्माण होणाऱ्या अडीअडचणी प्रशासनाने समजून घेतल्या व त्यातील काही अडचणींवर तात्काळ तोडगा देखील काढला. मात्र ज्यांच्याकडे आदर्श व आशेचा किरण म्हणून जनता व प्रशासन पाहत असते ते मोठे राजकिय नेत्यांनी मात्र या बैठकीकडे पाठ फिरवलेली दिसली.
खासदार स्मिता वाघ, आमदार अनिल पाटील हे काही कामानिमित्त दिल्ली येथे गेले होते. काल ते दुपारी उशिरा अमळनेरात दाखल झाले म्हणून त्यांचा विषय जनता समजू शकेल. मात्र माजी आमदार साहेबराव पाटील, माजी आमदार शिरीष चौधरी, माजी आमदार डॉ. बी.एस. पाटील यांनी तरी येणे गरजेचे होते. मात्र तेही आले नाहीत. म्हणून राजकिय मंडळींना अमळनेर शांत रहावे असे वाटत नाही का असा सवाल अनेकांनी उपस्थित केला आहे.
बैठकीला प्रांताधिकारी नितीनकुमार मुंडावरे, तहसीलदार रुपेशकुमार सुराणा, पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम, मारवडचे सहायक पोलीस निरीक्षक जीभाऊ पाटील, नगर परिषद मुख्याधिकारी तुषार नेरकर यांच्यासह इतर अधिकारी उपस्थित होते.
गणेश मंडळांनी उपस्थित केलेल्या अडचणी आम्ही दूर करण्याचा प्रयत्न करू असे आश्वासन यावेळी अधिकाऱ्यांनी दिले आहे. तर या गणेश उत्सवात महाराष्ट्र शासनाकडून आयोजित केलेल्या स्पर्धा व इतर बाबींबद्दल प्रांताधिकारी नितीनकुमार मुंडावरे यांनी मार्गदर्शन केले तर आम्ही अमळनेर मधील कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी कटिबद्ध असल्याचे अमळनेर पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम यांनी सांगितले.
