खेडी व्यवहारदळे रेल्वे भुयारी मार्ग पाण्याने भरला….
प्रवास्यांचे हाल ; भुयारी मार्गातून तात्काळ पाणी काढण्याची गरज

अमळनेर : तालुक्यातील खेडी व्यवहारदळे जाताना रस्त्यात असलेला रेल्वे भुयारी मार्ग पाण्याने भरून गेला असून प्रवास्यांना ये-जा करण्यासाठी पर्यायी मार्ग देखील नसल्याने मोठे हाल होत आहेत. गेल्या तीन दिवसांपासून पाऊस सुरू असल्याने हा भुयारी मार्ग पाण्याने भरून गेला आहे. म्हणून तात्काळ हे पाणी काढून प्रवास्यांसाठी मार्ग मोकळा करावा अशी मागणी खेडी व्यवहारदळे येथील ग्रामस्थ मंडळी करीत आहेत.

या भुयारी मार्गाचे बांधकाम करतांना कोणते इंजिनिअर होते व त्यांनी हे काम कसे केले असावे, कसे डोके लढवले असावे असा सवाल यावेळी उपस्थित होत आहे. अमळनेर तालुक्यात झालेले जवळपास सर्वच बोगदे असेच असून एकही भुयारी मार्गातून तात्काळ पाण्याचा निचरा होत नाही. त्यासाठी मोटर लावून ते पाणी काढले जात असल्याचे ग्रामस्थ सांगत असतात. धरणगाव रस्त्यावरील सती माता मंदिराजवळ असलेला रेल्वे भुयारी मार्गाची सुद्धा हीच परिस्थिती असून माणूस पूर्ण बुडून जाईल एवढे पाणी गेल्या तीन दिवसांपूर्वी साचले असल्याचे सांगण्यात येत आहे.
दरम्यान एकतर हा भुयारी मार्ग पाणी निचरा होईल असा दुरुस्त करावा किंवा पर्यायी मार्ग रेल्वे प्रशासनाने उपलब्ध करून घ्यावा अशी मागणी होत आहे.

