मच्छी मार्केटला अवैध धंद्यांचा विळखा….
पीआय साहेब आरसा दाखवणाऱ्यांना धमक्या देण्यापेक्षा अवैध धंदे बंद करा
अमळनेर : येथील मच्छी मार्केट व लिलाव शेडला अवैध धंद्यांचा विळखा तयार झाला असून पोलीस निरीक्षक अमळनेर यांनी आरसा दाखवणाऱ्यांना धमक्या देण्यापेक्षा अवैध धंदे वाल्यांना त्यांची जागा दाखवा अशी अपेक्षा दिव्य लोकतंत्रचे संपादक डॉ. समाधान मैराळे यांनी केली आहे.
मच्छी मार्केट, लिलाव शेड व त्याच्या जवळपासच्या भागात तितली – खबूतर नामक खेळ, सट्टे, पत्ते, दारू व इतर अवैध धंदे जोमात सुरू आहेत. या बाबत पोलीस निरीक्षकांना माहिती नसेल असे शक्यच नाही. मात्र याकडे अमळनेर पोलीस निरीक्षक कानाडोळा करीत आहेत. आणि हा काणाडोळा कशामुळे होतोय हे लपून राहिलेले नाही. तर काही दिवसांपासून अवैध धंद्यांच्या संदर्भात बातम्या प्रसिद्ध केल्याने व अवैध धंद्यांच्या विरोधात 15 ऑगष्ट रोजी असलेल्या उपोषणाच्या पार्श्वभूमीवर डॉ. मैराळे यांना पोलीस निरीक्षकांनी धमकी दिली आहे. तुम्ही माझी मानहानी करीत असून तुमच्यावर तसा दावा दाखल करेल, खोटा गुन्हा दाखल करेल व इतर धमक्या देत आता मी माझ्या पद्धतीने बघतो अशीही धमकी दिली आहे. अवैध धंदे जोमात सुरू असतील तर त्या बाबत बातमी लिहीली जात असेल तर जबाबदार अधिकाऱ्याचे नाव त्यात येतेच तर ही कुठली मानहानी होते ? हे जरा पोलीस निरीक्षक निकम यांनी शिकणे गरजेचे आहे. आरोप सहन होत नसतील तर अवैध धंदे बंद करा आणि तेही होत नसेल तर आरोप सहन करावेच लागतील असे अनेकांचे मत आहे.
पत्रकारांना धमकी मिळणे, धमकी खाणे, गुन्हे पचवणे हे पत्रकारांच्या पाचवीलाच पुजलेले असते म्हणून अशा पोकळ धमक्यांना मी भक घालत नाही तर सोमवारी उपोषणाच्या संदर्भात स्मरणपत्र दिल्याच्या रागातून पोलीस निरीक्षक निकम यांनी ही धमकी दिली असल्याचेही डॉ. मैराळे यांनी म्हटले आहे.
दरम्यान या संदर्भात संपूर्ण महाराष्ट्रभरात निवेदने देऊन आंदोलने केली जाणार असल्याची माहिती महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्या प्रदेश उपाध्यक्ष किशोर रायसाकडा तसेच इतर प्रदेश पदाधिकाऱ्यांनी म्हटले आहे.