पोलीस अजून मारतील या धाकाने संशयिताची आत्महत्या ?
मर्डरर संदानशिव प्रकरणात होत संशयित

अमळनेर : गेल्या काही महिन्यात दोन महिलांचा खून करणारा मर्डरर संदानशिव प्रकरणातील दुसरा संशयित अनिल झुलाल भिल याने आज सकाळी जानवे येथे आत्महत्या करून आपले जीवन संपवले. त्याने आत्महत्या का केली याचे कारण गुलदस्त्यात असून मात्र त्याच्या नातलगांनी पोलिसांवर अनेक आरोप केले आहेत.
बुधवारी अनिल भिल याला अमळनेर पोलिसांत चौकशी साठी बोलावण्यात आले होते. मात्र त्या ठिकाणी त्याला पोलिसांनी मारहाण केली होती व पोलिसांकडून घाण शिवीगाळ देखील करण्यात आली असल्याने तसेच तू उद्या ये तुला जीवनभर जेल मध्येच राहावं लागेल असे पोलिसांनी त्याला धमकावले होते यामुळे अनिल भिल याने आत्महत्या केली असल्याचा आरोप त्याच्या नातलगांनी केला आहे.
अनिल भिल याचे मर्डरर संदानशिव प्रकरणात त्याच्याशी संपर्क असून सुमारे 500 कॉल दोघांचे झाले असल्याने आम्ही त्याला चौकशीसाठी बोलावले होते. मात्र त्याला एवढी मारहाण झाली नव्हती असे पोलिसांचे म्हणणे आहे.
अनिल भिल याला लथाबुक्यांनी पोलीस शिपाई निलेश मोरे व इतर पोलीस कर्मचारी यांनी आमच्यासमोर मारले असून त्याला घाण शिवीगाळ करत गुन्हा कबूल करण्यासाठी धमक्या देखील दिल्या असल्याचे शैईसिंग भिल या मयताच्या भावाने म्हटले आहे. व हे सर्व पोलीस निरीक्षक दत्तात्रेय निकम यांच्या सांगण्यावरून कर्मचाऱ्यांनी केले असल्याचाही आरोप त्यांच्या नातलगांनी केला आहे.
सध्याच्या काळात गुन्हा सिद्ध असलेल्या आरोपीला देखील मारणे किंवा थर्ड डिग्री देणे चुकीचे असतांना संशयिताला मारणे योग्य आहे का असा सवाल कायद्याचे जाणकार मंडळींनी उपस्थित केला आहे.
गेल्या काही दिवसांपूर्वी देखील अश्याच प्रकारे एका तरुणाला मारण्याचा प्रकार अमळनेरात घडला होता.
