सारबेटे आरोग्य उपकेंद्र बंद….
डॉक्टर व कर्मचाऱ्यांची नियुक्ती असूनही उपस्थित का नाहीत ?
अमळनेर : तालुक्यातील सारबेटे तांडा येथील रस्त्यावर प्रसूत झालेल्या महिलेची घटना ताजी असतांनाच आज दिव्य लोकतंत्रने सारबेटे येथे भेट दिली असता आयुष्यमान आरोग्य मंदिर म्हणजे आरोग्य उपकेंद्र बंद स्थितीमध्ये असलेले आढळून आले.
हे आरोग्य उपक्रम बंद अवस्थेत का आहे व कधी पासून बंद आहे असा सवाल ग्रामस्थांना विचारला असता तेथील ग्रामस्थांनी सांगितले की, याठिकाणी कर्मचारी कधी येतात तर कधी येत नाहीत. उलट अनेक वेळेस रुग्णांना सरळ अमळनेर येथील खासगी रुग्णालयात किंवा ढेकू येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात घेऊन जावे लागते. म्हणून हे आरोग्य उपकेंद्र आमच्या गावात फक्त नावाला आहे का असा सवाल ग्रामस्थांनी उपस्थित केला आहे.
तालुक्यातील आरोग्य यंत्रणा खोळंबली असल्याचे वृत्त गेल्या काही दिवसांपूर्वी दिव्य लोकतंत्रने प्रकाशित केले होते. मात्र तरीही प्रशासनाला जाग येत नसेल तर प्रशासनाने कोणती झोप घेतली असावी असा सवाल आहे. कारण अनेक वेळेस ही बाब तालुका व जिल्हा प्रशासनाच्या लक्षात आणून दिली गेली आहे.
दरम्यान जर नियुक्त केलेले कर्मचारी आरोग्य उपकेंद्रात उपस्थित राहत नसतील तर यांना शासन पगार कशाचा देत आहे. असा सवाल उपस्थित होत असून आजचा पगार या कर्मचाऱ्यांचा कपात करावा जेणेकरून ते पुढे चालून आपले कर्तव्य व्यवस्थित पूर्ण करतील.