सारबेटे गावात घाणीचे साम्राज्य….
ग्रामपंचायतीच्या दुर्लक्षाने गावात पसरू शकते रोगराई
अमळनेर : तालुक्यातील सारबेटे गावात मोठया प्रमाणात घाणीचे साम्राज्य पसरले असून ग्रामपंचायतीच्या दुर्लक्षाने गावात रोगराई पसरू शकते अशी दाट शक्यता आहे. म्हणून याकडे प्रशासनाने तात्काळ लक्ष देणे गरजेचे आहे.
सारबेटे गावातील जवळ – जवळ सर्वच गटारी तुंबल्या असून त्यांच्या वरून घाण वाहत असते. गावात पिण्याचे पाणी देखील खराब येत आहे, व त्यात देखील दुर्गंध येत असल्याची धक्कादायक माहिती ग्रामस्थांनी दिली आहे. गावातील जिल्हा परिषद उर्दू शाळेच्या समोरच गावातील संपुर्ण कचरा गोळा केला जातो व तो अनेक महिने तिथेच पडून असतो.या सर्व बाबी रोगराईला आमंत्रण देणाऱ्या आहेत.
अनेक वेळेस तक्रारी करूनही कारवाई नाही
जिल्हा परिषद उर्दू शाळा व्यवस्थापन समितीने ग्रामपंचायत व पंचायत समिती यांना कचरा कुंडी व शाळेसमोरील शोषखड्डा उचलण्यात यावा यासाठी सुमारे तीन ते चार पत्रे दिली आहेत. मग ग्रामपंचायत व पंचायत समिती रोगराई पसरण्याची वाट पाहत आहेत का असा संतप्त सवाल शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षांनी केला आहे. शाळेत जाणाऱ्या विद्यार्थ्यांना याठिकाणीच दुर्गंधाचा मोठा सामना करावा लागतो, तर काही विद्यार्थी आहारी देखील होत असतात. म्हणून प्रशासनाने तात्काळ याबाबत पाऊल उचलणे गरजेचे आहे.
गटारी तुंबल्या….
गावातील जवळ जवळ सर्वच गटारी तुंबल्या असून गटारींमध्ये जाणारे पाणी व इतर घाण ही वरती येऊन गल्ल्यांमध्ये शिरत आहे. व यामुळेही ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यात आले आहे.
सरपंच, ग्रामसेवकांचे दुर्लक्ष
सारबेटे बु. येथील सरपंच व ग्रामसेवक यांचे गावाकडे जाणूनबुजून दुर्लक्ष असल्याचे ग्रामस्थ सांगत आहेत. त्यांच्याकडे अनेक वेळेस लिखित व मौखिक तक्रारी करून देखील ते लक्ष देत नसून शाळेसमोरील घाण उचण्यासंदर्भात मी काहीच करू शकत नाही, असे ग्रामसेवक सांगत असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे.
दरम्यान पावसाळा सुरू असून याच काळात जास्त रोगराई पसरण्याची भीती असते. मात्र ग्रामपंचायत याच काळात अशी चूक करत असेल तर या गावात रोगराई पसरण्यासाठी जास्त वेळ लागणार नाही. म्हणून अमळनेर पंचायत समिती गट विकास अधिकारी यांनी तात्काळ ग्रामपंचायतीला सर्व घाणीची योग्य ठिकाणी विल्हेवाट लावण्यासाठी आदेश द्यावेत ही मागणी होत आहे.